Marathi News
Shimmgga – Chandan Ratila Aala Shimmgga Song Released
आला रे आला चांदणं रातीला शिमगा आला … ‘शिमगा’ चित्रपटातील गाणे प्रदर्शित
होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्यासाठी सगळे गावकरी ग्रामदेवतेच्या देवळात जमतात आणि नाचत ढोलताश्यांच्या गजरात, होम करून धुमधडाक्यात शिमगा साजरा करतात . हा सण साजरा करताना गावातील वाडी-वाडीमध्ये पालखी नाचवताना जुगलबंदी देखील होते. अशा या शिमगा सणाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला देण्यासाठी याच संकल्पनेवर आधारित असा ‘शिमगा’ हा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘चांदणं रातीला आला शिमगा’ हे उत्साहवर्धक गाणं सोशल मीडिया वर प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये भूषण प्रधान थिरकताना दिसत आहे आणि त्याच्या जोडीला राजेश शृंगारपुरे, कमलेश सावंत देखील दिसत आहेत. गाण्यामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ढोलताशांच्या गजरात, जल्लोषाने शिमगा म्हणजेच होळी सण साजरा होत आहे. शिमगा सणात नारळ, पुरणपोळी अर्पण करण्याची प्रथा या गाण्यात सुद्धा दाखवली आहे.
या गाण्याचे शूटिंग कोकणातील लांजा येथील आसगे या गावी करण्यात आले. दिवसभर चित्रपटाचे शूटिंग आणि संध्याकाळ झाली की, गाण्याचे शूटिंग व्हायचे. तीन दिवस सतत चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अविश्रांत मेहनत घेऊन हे गाणं चित्रित केले. शिमगा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला नाचताना खूप त्रास होत होता. पेटत्या शिमग्याच्या झळांमुळे नाचताना चटके पण बसायचे. शिवाय हा शिमगा पेटवण्यासाठी जे कोरडे गवत लागायचे ते गवत पेटवताक्षणी काही सेकंदात जळून जायचे. त्यामुळे खूपच कमी वेळात जास्तीत जास्त सीन शूट केले जायचे. पण सरतेशेवटी हे शिमग्याचे गाणे पूर्ण झाले.
दीपाली विचारे यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. हे गाणं वलय यांनी लिहिले असून पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केले आहे. सौरभ साळुंखे यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात हे गाणं स्वरबद्ध केले आहे.
श्री केळमाई भवानी प्रॉडक्शन निर्मित ‘शिमगा’ हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. मूळचे कोकणाचे असणारे निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, भूषण प्रधान आणि कमलेश सावंत यांच्यासह विजय आंदळकर, सुकन्या सुर्वे आणि नवोदित अभिनेत्री मानसी पंड्या यांच्या भूमिका आहेत.