रोहित कोकाटे मुळे मराठीला लाभलाय खतरनाक खलनायक

अभिनेता म्हणून सर्व प्रकारच्या भूमिका साकारता आल्या पाहिजेत… एकाच साचात न राहता काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न म्हणून खलनायकी जरी साकारावी लागली तरी चालेल. कोणत्याही अभिनेत्याला खलनायकाची भूमिका साकारताना थोडी तरी भिती वाटत असावी, कारण खलनायक म्हणून प्रेक्षकांकडून त्या अभिनेत्याला नापसंती पण मिळण्याची शक्यता असते. पण आपण एक कलाकार आहोत, त्यामुळे वेगवेगळ्या भूमिकेतून आपले अभिनय कौशल्य दाखवता आले पाहिजेत हे मनाशी पक्कं करुन अभिनेता रोहित कोकाटेने Zee5 च्या ‘डेट विथ सई’ या वेब सिरीजमध्ये ‘हिमांशु’ या पॉश आणि सभ्य व्यक्तिच्या मागे असलेला खरा चेहरा ‘रघुनाथ’ नावाचे खलनायकाचे पात्रं साकारले आहे. ‘डेट विथ सई’मध्ये सईसोबत प्रेक्षकांनाही विश्वास बसेल असा हिमांशु आणि काही क्षणांनंतर खरा स्वभाव दाखवलेला रघुनाथ याची भिती वाटल्याशिवाय राहत नाही, असा दमदार आणि पात्रात शिरुन खरा आणि प्रामाणिक अभिनय रोहितने केला आहे.
खलनायकाच्या पात्राची भिती वाटते याचाच अर्था असा की रोहितने त्याच्या अभिनयाने पात्रात जाण आणली आणि मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी त्याच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले. आपल्या मराठीमध्ये खलनायक साकारणा-या कलाकारांची संख्या फार कमी आहे, सहसा कोणी खलनायकी साकारायला तयार होत नाही. पण रोहितने खलनायक साकारण्याचा निर्णय पक्का केला आणि मेहनतीने-हुशारीने आणि तितक्याच हिमतीने ते पात्र साकारले.
खलनायक निवडीविषयी विचारले असता रोहित कोकाटेने म्हटले की, “खलनायक साकारताना एका चौकटीत राहण्याची गरज लागत नाही. पात्र खरं वाटण्यासाठी कलाकार जे जमेल ते करु शकतो. आणि सध्या खलनायकच्या पात्राला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. खलनायक साकारताना मला कोणत्याही प्रकारचं दडपण नव्हतं, कारण माझं संपूर्ण लक्ष माझ्या अभिनयावर होतं आणि भविष्यात पुन्हा एकदा खलनायकाची भूमिका साकारण्याची वेळ आली तर मी खुशाल साकारेन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘डेट विथ सई’ मधील माझ्या अभिनयाचे कौतुक माझे सहकलाकार, या वेब सिरीजचे निर्माते, मराठी इंडस्ट्री, मिडीया आणि मित्र परिवार यांनी केल्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे.”
खलनायक म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेला रोहित कोकाटे पुन्हा एकदा खलनायक साकारणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार हे नक्की!
Leave a Reply
You must be logged in to post a comment.