पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी ‘बोनस’ चित्रपटामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार
आगामी ‘बोनस’ या चित्रपटातील नायक-नायिकेच्या अगदी वेगळ्या लुकमधील पोस्टर्स निर्मात्यांनी नुकतेच सोशल आणि इतर मिडीयावर प्रदर्शित केले असून त्यांना चित्रपट रसिकांकडून उत्तुंग प्रतिसाद मिळतो आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची नायिका पूजा सावंतच्या वाढदिवशी एका टॅगलाईनसह चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये पूजा कोळी वेशात असून ती त्यात अत्यंत सुंदर दिसली आहे. ‘जग एकच आहे आणि आपण सगळे त्या एकाच जगाचा भाग आहोत’ या चित्रपटातील टॅगलाइनसह हे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि अर्जुन सिंग बरान व कार्तिक डी निशाणदार प्रस्तुत, गोविंद उभे, अनुपमा कराळे, कांचन पाटील व जीसिम्स निर्मित आणि सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
पोस्टर्समधील या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये नेमके काय पहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठीतील ग्लॅमरस कलाकार पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा सिनेमा रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतो. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत ‘बोनस’ चित्रपटात एक वेगळीच भूमिका साकारत आहे.
‘बोनस’ हा एका अशा मुलाचा आनंदप्रवास आहे की आपल्या वाट्याचे चांगले प्रसंग जगाबरोबर शेअर करताना त्याचे आयुष्य बदलून जाते आणि त्याच्या धारणाही संपूर्णपणे बदलून जातात. अशा या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे गश्मीर महाजनीच्या प्रेयसीची भूमिका पूजा सावंत साकारत आहे. आपण नेहमीच इच्छित असलेल्या कोणत्याही चांगल्या मित्रांसारखे या दोघांचे नाते आहे.
पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वात सुंदर अशा नायिकांपैकी एक आहे. तिच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपट आहेत. पूजाने २०१० साली आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली आणि त्यानंतर यशाचे ऊंच शिखर गाठले. पूजाने ‘लपाछपी, सतरंगी रे, सांगतो ऐका, नीलकंठ मास्तर, झकास, पोस्टर बॉईज, दगडी चाळ अशा अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत.
पूजाने हिंदी रिअॅलिटी शो ‘बुगी वूगी’ आणि मराठी टीव्ही शो ‘एकापेक्षा एक–जल्लोष सुवर्णयुगाचा’ या सारख्या शोमध्ये कधी आपल्या अभिनयाने तर कधी नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर तिने ‘वाजले कि बारा’ या टीव्ही शोचे सूत्रसंचालनसुद्धा केले होते. २०१०मध्ये हिंदी चित्रपट ‘तुम मिलो तो सही’ मध्येही एक छोटीशी भूमिका केली. तसेच ‘नीलकंठ मास्तर’ या चित्रपटातील एका गाण्यासाठी तिने नृत्यदिग्दर्शनही केलेले आहे. नुकतीच तिने ‘जंगली’ या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका साकारली आहे. मुख्य म्हणजे ‘लपाछपी’ चित्रपटात पूजाने साकारलेल्या भूमिकेला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा महत्वाचा पुरस्कार मिळाला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात युवा दिग्दर्शक सौरभ भावे याने केले आहे. त्यांची ओळख एक प्रख्यात कथा आणि पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यांत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक आदी चित्रपटांचा समावेश आहे.