स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘मोगरा फुलला’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
श्रावणी देवधर दिग्दर्शित आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (जीसिम्स)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ मध्ये स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १४ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एकदम नव्या लूकमध्ये या चित्रपटात प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्वप्निल जोशीच्या नव्या अवतारामुळे तसेच श्रावणी देवधर पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला.
या ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या भूमिकेत आहे दिसत आहे, लग्न होत नसलेला तरी आईवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलाच्या भूमिकेत स्वप्नील पाहायला मिळत आहे. तर नीना कुळकर्णी यांनी त्याच्या आईची भूमिका साकारली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे स्वप्नीलच्या काकाची भूमिका साकारत आहेत. याशिवाय ट्रेलरमध्ये सई देवधर, संदीप पाठक, आनंद इंगळे, आणि इतर आघाडीचे कलाकारदेखील दिसत आहे. तसेच सई देवधर हिचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. ‘नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा’ या वाक्याला तंतोतंत जुळेल असा हा ‘मोगरा फुलला’ चित्रपटाचा ट्रेलर असून यावरून अस वाटतंय की, हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या कायम समरणात राहील यात काही शंका नाही.
या चित्रपटामध्ये स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, संदीप पाठक, आनंद इंगळे, यांशिवाय सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नाळीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये,हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.
‘मोगरा फुलला’ला रोहित राऊतने संगीत दिले असून यातील गाणी शंकर महादेवन, बेला शेंडे, जसराज जोशी आणि रोहित राऊतने गायली आहेत. “हलके अन हळुवारसा.. हो मुका अन अलवारसा…” या नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या आणि शंकर महादेवन यांनी गायलेल्या गाण्याला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. त्याआधी रोहित राऊतने संगीतबद्ध केलेले व गायलेले श्रवणीय असे ‘मनमोहिनी‘ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे रोहित राऊत आणि बेला शेंडे यांनी गायले असून स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्यावर चित्रित झाले आहे. त्यालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटातील ‘मारवा’हे गाणे आघाडीचा गायक जसराज जोशी याने गायले आहे.
“वेगळा लुक, उत्तम कलाकार, दर्जेदार संगीत आणि त्याजोडीला कसदार कथा व साजेसे दिग्दर्शन या गोष्टींमुळे मोगरा फुलला अगदी जुळून आला आहे. हा चित्रपट चित्रित करताना एक वेगळे समाधान मला मिळाले आणि तो पाहताना ते प्रेक्षकांनाही मिळेल, याबद्दल शंका नाही,” असे उद्गार स्वप्नील जोशीने काढले.
नीना कुळकर्णी सांगतात, “मी सेटवर काम करत असताना खुश होते कारण या चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी माझी जुनी मैत्रीण आहे. स्वप्नील जोशीबरोबर पुन्हा १४ वर्षांनी काम करायला मिळालं, त्याच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव फारच छान होता. अभिनेता म्हणून तो हुशार आहे पण माणूस म्हणून देखील खूप छान आहे मी त्याला खूप वर्षांपासून ओळखते मला त्याचा स्वभाव फार आवडतो. चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे ह्यांच्या बरोबर पुन्हा काम करायला मजा आली. ‘मोगरा फुलाला‘ ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. या कथेमधील माझं पात्र साकारताना मला खूप समाधान मिळालं. या चित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांचादेखील विशेष उल्लेख करेन. त्यांचे विशेष आभार.”
श्रावणी देवधर सांगतात, “या चित्रपटाच्या माध्यमातून मी बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शनामध्ये पुनरागमन करत असल्याचा मला अत्यंत आनंद आहे ‘मोगरा फुलला’मध्ये आगळ्या पद्धतीने गुंफलेली अशी प्रेमकथा आहे. कौटुंबिक समस्यांमध्ये गुंतलेल्या एका मुलाभोवती ही कथा फिरते. त्याच्या या समस्यांमुळे त्याच्या लक्षातही येत नाही की, आपले लग्नाचे वय उलटून गेले आहे. एके दिवशी तो अत्यंत खंबीर आणि स्वतंत्र विचाराच्या मुलीच्या प्रेमात पडतो. ती एका वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलगी आहे. त्याच्याही लक्षात जेव्हा प्रेमाची ही बाब येते तेव्हा ही प्रेमकथा खूप पुढे सरकलेली असते,
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जीसिम्स फिल्म्स’ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात फुगे, तुला कळणार नाही, रणांगण यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे, स्टार प्रवाह वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेची निर्मिती त्याचबरोबर ‘भिकारी’ या चित्रपटची प्रस्तुती देखील‘जीसिम्सने केली आहे. भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असलेल्या ‘पॅनोरमा स्टुडिओज’ने‘मोगरा फुलला’च्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे.
प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा‘टच’ देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.