मिस यू मिस्टर’चे गाणे सोनू निगमच्या आवाजात
ग्लॅमरस सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांचा चित्रपट म्हणून ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला असताना चित्रपटाबद्दल आणखी एक खास बाब समोर आहे. चित्रपटातील एक गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक सोनू निगम याने गायले आहे.“मला माहीत आहे असे होणार आहे, फुलांनी मालवलेल्याचा ऋतू येणार आहे. तुला मी पाहतो म्हणून…” हे ते अत्यंत उत्कट असे गाणे असून सोनूने त्याच्या आयुष्यातील ते सर्वोत्तम गाण्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.
सोनू निगमने गायलेल्या या गाण्याला संगीतबद्ध केले आहे, गुजराती संगीत क्षेत्रातील आघाडीचे संगीतकार आलाप देसाई यांनी. हे गीत वैभव जोशी यांनी लिहिले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत अर्थपूर्ण अशा शब्दांना तितकेच मधुर आणि हळुवार अशी लय आणि सूर लाभले आहेत. या गाण्यातून चित्रपटात पडद्यावर साकारले गेलेले विविध भाव प्रभावीपणे व्यक्त होतात.
सोनू निगम म्हणाले की, “मी खूप चांगली चांगली गाणी गायली आहेत, पण माझ्या कारकिर्दीतील हे एक सर्वोत्तम गाणे आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आलाप देसाई यांनी एवढे उत्तम गाणे तयार केले आहे की, म्हटले तर ते एक गाणेही आहे आणि एक प्रार्थनाही आहे. ज्याला शब्दही कळत नाहीत, असाही माणूस या गाण्याने मोहीत होईल. मला हे गाणे गाण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्यच मानतो. माझ्या सर्वच गाण्यांमध्ये या गाण्याचे स्थान विशेष असेल,” तो म्हणतो.
आलाप देसाई म्हणतात, “या गाण्यातून काहीतरी वेगळे, नवे देण्याचा प्रयत्न केला आहे. अगदीच कमी वाद्ये वापरून बरेच काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हर्मोनिका, गिटार, हार्प अशा अगदी मोजक्या ५-६ वाद्यांमधून पूर्ण बॅंकग्राऊड उभे केले आहे. त्यातून एक वेगळाच तजेला ऐकणाऱ्याला प्राप्त होतो. हे गाणे म्हणजे एक प्रार्थना आहे”.
‘मिस यू मिस्टर’ २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यातून या चित्रपटाची कथा संकल्पना अधोरेखित होतेच, पण त्याचबरोबर नुकत्याच प्रकाशित झालेल्या टीझर आणि ट्रेलरमुळे कथेचा पोत अधिकाधिक उलगडत जातो. आपल्या करियरच्या निमित्ताने आजची तरुण जोडपी एकमेकांपासून दूर राहतात, त्यांच्यातील दुरावा वाढतो. प्रेमाच्या नात्याला ओढ लागते, तर कधीकधी त्यावर ताणही येतो. अर्थातच त्यांच्या नात्यामध्ये, कौटुंबिक बंधांमध्ये अनेक बदल घडतात. नव्या पिढीच्या नजरेतून, त्यांच्या जीवनशैलीचे प्रदर्शन घडवत ही कथा आकाराला येते. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटात राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर यांच्याही भूमिका आहेत. अनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ज्यांच्या नावावर आहेत असे समीर जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली आहे. थ्री आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.