इपितरला मिळतोय हाउसफुल प्रतिसाद
परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्या ह्या तीन इरसाल मित्रांची धमाल कथा ‘इपितर’ सिनेमाव्दारे 13 जुलैला रूपेरी पडद्यावर झळकली आहे. ग्रामीण लोकेशन्स, कलाकारांची गावरान निरागसता, आणि जोडीला कॉमिक टाइमिंग हे सर्व इपितर सिनेमामध्ये मोठ्या पडद्यावर बघताना प्रेक्षकांना वेगळीच मजा येते आहे. हे सध्या महाराष्ट्रभर रसिक प्रेक्षकांनी दिलेल्यापसंतीच्या पावतीवरूनच दिसून आले आहे. महाराष्ट्रात ब-याच भागात इपितर सिनेमाच्या शोजना हाउसफुलची पाटी लागलेली दिसत आहे.
ह्याविषयी लेखक-निर्माते किरण बेरड म्हणतात, “मैत्रीच्या नात्याचा गोडवा, त्यातली अवखळता आणि मस्ती ह्या सर्वाचा मिलाफ इपितरमधून प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि सध्या सिनेमागृहांच्या बाहेर झळकणा-या हाऊसफुलच्या पाट्यांनी तर आम्हांला शाबासकीची पावतीच मिळालीय. खूप आनंद होतोय. प्रेक्षकांचे प्रेम असेच भरभरून मिळावे ही अपेक्षा आहे.”
डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर सिनेमाची निर्मिती नितिन कल्हापूरे आणि किरण बेरड ह्यांनी केली आहे. सुधीर बोरूडे, दत्ता तारडे आणि विकास इंगळे ह्यांची सहनिर्मिती असलेल्या इपितर ह्या विनोदी सिनेमाचे लेखन किरण बेरड ह्यांनी केले असून दिग्दर्शन दत्ता तारडे ह्यांनी केले आहे. भारत गणेशपुरे ,मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे ,जयेश चव्हाण ,विजय गीते ,गणेश खाडे ,निकिता सुखदेव, वृंदा बाळ आणि सुहास दुधाडे ह्यांच्या मुख्य भूमिका असलेला इपितर हा सिनेमा 13 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.