अमिताभ जीं सोबत दिसणार हे प्रेक्षकांचे लाडके मराठी कलाकार
प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहुर्त सोहळा नुकताच पार पडला. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने अमिताभ बच्चन देखील या सिनेमात दिसणार आहेत ही आनंदाची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचली. अमिताभ बच्चन मराठी सिनेमात दिसणार याचा आनंद जितका मराठी प्रेक्षकांना झाला आहे तितकाच आनंद या सिनेमात त्यांच्यासोबत काम करणा-या कलाकारांना देखील झालाच असेल… अर्थात झाला आहे तसे त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरुन देखील व्यक्त केले आहे. पण बिग बींसोबत नेमके कोण दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच असेल.
नाटक, मालिका, सिनेमा या तिन्ही माध्यमात उत्तम काम करून त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम लक्षात ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर त्यांच्या सोबतीला गेल्या वर्षी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्राकडून प्रचंड प्रेम मिळवणारा अभिनेता सुबोध भावे, गोंडस आणि सुंदर अशी अभिनेत्री सायली संजीव आणि अचूक कॉमेडी टायमिंगने प्रत्येकाला हसवणारा अक्षय टंकसाळे पण महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. ब-याच वर्षांनी सायलीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचा चाहता वर्ग नक्कीच आतुर असेल. या सिनेमात अमिताभजी कॅमिओ रोल साकारणार असून विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील. त्यामुळे अमिताभजी आणि विक्रम गोखले यांच्यातील ऑन स्क्रिन मैत्री पाहायला वेगळीच मजा येणार आहे.
काय असेल या सिनेमाची गोष्ट…? नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.