Marathi News

BOYZ 2 – लडाखच्या गुलाबी थंडीची अनुभूती देणारे ‘बॉईज २’ चे रोमँटिक गाणं सादर

BOYZ
कॉलेजविश्वात आणि त्याचबरोबर ओघाने येणाऱ्या प्रेमविश्वात नुकतंच पदार्पण झालेल्या, मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या, ‘बॉईज २’ मधील ‘शोना’ हे रोमँटिक साँग नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. लेह लडाखमध्ये चित्रित करण्यात आलेले हे गाणे, प्रेमाच्या गुलाबी थंडीची अनुभूती देऊन जाते. सुप्रसिद्ध प्रेमगीतकार मंदार चोळकर लिखित या गाण्याला, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा आवाज लाभला आहे. निसर्गाच्या कुशीत आणि बोचऱ्या थंडीत प्रेमाची हळूवार पालवी फुलवणारं हे गाणं सुमंत शिंदे आणि सायली पाटील या फ्रेश जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. प्रेमीजोडप्यांना आकर्षित करणाऱ्या या गाण्यातील विहंगम दृश्य रसिकांचे मन मोहून टाकतात.
हे गाणे पडद्यावर खूप सुंदर दिसत असले तरी, त्याची पडद्यामागील मेहनत खूप मोठी होती. कारण, बर्फाळ प्रदेशातील प्रतिकूल परिस्थितीचा तडाका या सिनेमाच्या चित्रीकरणालादेखील बसला होता. तिकडच्या अतिथंडीने नाकातून रक्त आल्यामुळे अनेकजणांना दवाखान्यात दाखल करावे लागले होते. इतकेच नव्हे तर, या गाण्याच्या आणि इतर काही भागांच्या चीत्रीकरणादरम्यान कलाकारांना ऑक्सिजन सिलेंडरद्वारे श्वास घ्यावा लागला होता. अश्या या प्रतिकूल वातावरणात चित्रित करण्यात आलेले हे गाणे, प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे.
इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा, ‘बॉईज’ चा डबल धमाका घेऊन येत आहे. सुमंत शिंदेबरोबरच पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भुमिकेत असलेल्या या सिनेमात तरुण कलाकारांचा मेळाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाविद्यालयीन जीवनातील भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले असून, ह्रीशिकेश कोळीचे संवादलेखन त्याला लाभले आहे. तसेच, सुपरहिट ‘बॉईज’चा हा दर्जेदार सिक्वेल घेऊन येण्यासाठी, सिनेमाचे निर्माते लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी मेहनत घेतली आहे. शिवाय, इरॉस इंटरनेशनलद्वारे हा चित्रपट जागतिक स्तरावरदेखील वितरीत केला जाणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button