Marathi News

प्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित

ab and CD

अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे यांची दाट मैत्री आहे म्हणे”, या वाक्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार आणि ही केवळ वरवरची चर्चा नसून यातला एक अन् एक शब्द खरा आहे, तसा ठोस पुरावा प्रेक्षकांकडे आहे. आता हा पुरावा म्हणजे नेमकं काय तर… मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ सिनेमाचा ट्रेलर.

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित ‘एबी आणि सीडी’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच मुंबई येथे पार पडला. ट्रेलर प्रकाशन सोहळ्यात सिनेमाची टीम आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकार अमृता खानविलकर, श्रेयस तळपदे, प्रसाद ओक उपस्थित होते.

“सुख आणि दु:ख सगळ्याची भरपूर आवर्तने झाली माझ्या आयुष्यात” या भावनिक संवादाने सुरु झालेला ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर हळूहळू सिनेमाच्या कथेची झलक दाखवतो. प्रत्येक घराघरांत घडणारी ही आजची गोष्ट आहे.

जुन्या गोष्टी अडगळीत टाकल्या जातात तसे वृद्धापकाळात घरातील वृद्धांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. पण या कठीण परिस्थितीत ७५ वर्षांचे चंद्रकांत देशपांडे यांच्या मदतीला फक्त त्यांचा मित्र धावून येतो आणि तो मित्र म्हणजे ‘एबी’ अर्थात ‘अमिताभ बच्चन’. अमिताभजींकडून आलेले एक पत्र ‘सीडी’ चंद्रकांत देशपांडेच्या आयुष्यात नवे, उत्सुकतेचे आणि आनंदाचे रंग भरायला मदत करते. एका पत्रामुळे सुरु झालेला ‘एबी आणि सीडी’चा याराना प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल हे मात्र नक्की. पण ‘आमची ओळख नाही’ असे सीडीने म्हटल्यावर देखील ‘चंदू मी आलोय’ अशी एबीची हाक प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता दुप्पट तिप्पट पध्दतीने वाढवणार याची खात्री वाटते.

सायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश, सुबोध भावे, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर या कलाकारांच्या सुंदर अभिनयाने नटलेला हा सिनेमा येत्या १३ मार्चला प्रदर्शित होत आहे. ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ‘सीडी’च्या ७५ व्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला ‘एबी’ ची उपस्थिती लाभते का हे प्रेक्षकांना १३ मार्चलाच कळेल.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button