बॉलिवूडकरांनाही ‘स्माईल प्लीज’ची भुरळ
रितेश देशमुखने केले पोस्टर लाँच तर करन जोहरच्या हस्ते टिझर प्रदर्शित
नुकतेच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने ‘विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर त्याच्या सोशल मीडियावर लाँच केले. या पोस्टरची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता बॉलिवूडला सुपरहिट सिनेमा देणारे दिग्दर्शक कारण जोहर यांनी ‘स्माईल प्लीज’चा टीझर सोशल मीडियावर लाँच केले आहे. त्यामुळे ‘स्माईल प्लीज’ने बॉलिवूडकरांनाही भुरळ घातल्याचे दिसत आहे. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या मुक्ताच्या आयुष्यात अचानक अशा काही गोष्टी घडायला लागतात ज्यामुळे तिचे आयुष्य बदलू लागते.
याच वळणावर तिच्या आयुष्यात नवीन उमेद बनून येतो तो ललित प्रभाकर. ”जगात इतकं मोठं काहीच नाही, की ज्याच्यासमोर आपण हार मानावी”, असा प्रेरणादायी सल्ला देत, तिला प्रतिकूल परिस्थिती तो साथ देत आहे. तर दुसरीकडे प्रसाद ओक जितका हळवा तितकाच तापटही दिसत आहे. जीवनाची पुनर्मांडणी करण्यास शिकवणारा ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर यांच्या प्रमुख भूमिका असून तृप्ती खामकर, सतीश आळेकर सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसतील. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट निश्चितच जगण्याचा नवा दृष्टिकोन देणारा आहे.