‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ
आपल्या घरी कोणी आजारी पडलं की सर्व घराची एकच धांदल उडते. सर्व कुटुंबीय आजारी माणसाच्या सेवेत गढून जातात. त्यातच पेशंट जर हॉस्पीटलाईझ्ड असेल तर विचारायलाच नको! आपल्या पेशंटसाठी डबा बनवणे आणि घेऊन जाणे, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर त्याला देणे आणि कोणीतरी सतत त्याच्या जवळ राहून त्याला काय हवे नको ते बघणे हे ओघानेच येते.स्वतःला धीर देत पेशंटलाही धीर द्यावा लागतो. वेगवेगळ्या टेस्ट्स, रिपोर्ट्स, गोळ्या-औषधे या सर्वांमध्ये आपण भांबावून नाही गेलो तर नवलच.
आपल्यापैकी प्रत्येकजण कधीतरी हॉस्पिटलच्या अनुभवातून आधी गेलेला असूनही प्रत्येक अनुभव हा जरा वेगळाच असतो. प्रत्येक हॉस्पिटल, डॉक्टर आणि स्टाफ यांच्या तऱ्हा सांभाळत आपल्या प्रिय व्यक्तीच्या उपचारात जराही हलगर्जी होऊ नये त्यांच्याशी गोडीगुलाबीने वागतो. पथ्य सोडून पेशंटचे खाण्यापिण्याचे लहरी हट्ट पुरवताना कधीकधी डॉक्टरांचा ओरडा खावा लागतो. पेशंटला भेटायला येणारे निरनिराळे नातेवाईक आणि त्यांचे नकोसे सल्ले याने बऱ्याचदा मनस्ताप होतो. या हॉस्पीटलवारी मध्ये सगळे घरच हॉस्पीटलाईझ्ड आहे की काय असे वाटू लागते. तरीसुद्धा हॉस्पिटलचा हा अनुभव घरातील सर्वांना एकत्र जोडतो. सर्व कुटुंबीयांनी केलेल्या सहकार्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीने बरे होऊन डिस्चार्ज घेतल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान मिळते.
असाच प्रसंग गुदरला आहे ‘ह. म. बने तु. म. बने’ मालिकेतील बने कुटुंबावर. मकरंदला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. ‘ह. म. बने तु. म.बने’ मालिका नेहमीच प्रेक्षकांशी कनेक्ट होणारेविषय घेऊन येते. आपल्या रोजच्या जीवनातील आंबटगोड प्रसंगांचे गंभीर तरीही विनोदी चित्रण या मालिकेमध्ये पहायला मिळते. आता या प्रसंगामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या स्वभावाचे बने कुटुंबीय काय मजेशीर गोंधळ घालतील हे बघायला खरंच मजा येणार आहे. हे सर्व पहा ‘ह. म. बने तु. म. बने’च्या २२ एप्रिल ते २७ एप्रिलच्या भागांत, फक्त सोनी मराठीवर.