हृतिक रोशनच्या ‘काबिल’ सिनेमातील अभिनेत्री करतेय मराठीत पदार्पण
काबिल सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री नीलम पांचाल आता लवकरच मराठीत पदार्पण करतेय. नुकत्याच झालेल्या 66व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आपला गुजराती चित्रपट ‘हिलारो’मधल्या अभिनयासाठी नीलमला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
इश्कबाज, वीरा, रूक जाना नहीं, हमारी देवरानी ह्या हिंदी मालिकेत काम केलेल्या नीलम पांचालने हृतिक रोशनच्या काबिल सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सध्या हिंदी नाट्यसृष्टीत गाजणा-या भारत भाग्यविधाता ह्या हिंदी नाटकात ‘कस्तुरबा’ ह्यांची भूमिका नीलम साकारत आहे. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात रजत कमल पुरस्काराने सन्मानित झालेल्या नीलम पांचालने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीयो टाकला आहे. ह्या व्हिडीयोत ती मराठीचे धडे गिरवताना दिसत आहे. त्यामूळे तिच्या मराठी पदार्पणाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
अभिनेत्री नीलम पांचालला ह्याविषयी विचारले असता ती म्हणाली, “हो मी सध्या माझ्या मराठीसृष्टीतल्या पदार्पणाची तयारी करत आहे. मी मुंबईत राहत असल्याने आणि मराठी सिनेमांची चाहती असल्याने मराठी मला समजते. पण मला बोलता येत नाही. पण आता मराठीत पदार्पण करत असल्याने मराठीचे धडे गिरवणे सध्या सुरू आहे.”
आता हा मराठी सिनेमा आहे की वेबसीरीज, नाटक आहे की मालिका, ह्याविषयी मात्र नीलमने काही सांगण्यास सध्या नकार दिला आहे. नीलम म्हणते, “सध्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे. मराठीतल्या एका नामवंत दिग्दर्शकाच्या प्रोजेक्टमध्ये मी काम करत आहे. आणि निर्मात्यांकडून अनाउन्समेन्ट न झाल्याने मी ह्याविषयी जास्त रिविल करू शकत नाही.”