हिंदीनंतर आता मराठीतही स्त्रीवादी चित्रपटांची नांदी… पोश्टर गर्लच्यानिमित्ताने मराठीतही स्त्रीवादी भूमिकांना वाव
एकेकाळी चित्रपट म्हटला की त्यात डॅशिंग पर्सनॅलिटी असलेला हिरो ठरलेला…त्याच्या सोबत गरज नसतानाही फक्त एक शोभेची वस्तू म्हणून स्त्री भूमिकांचा विचार केला जायचा…शत्रूंशी दोन हात करून आपल्या सुंदर, नाजूक हिरोइनला शत्रूच्या तावडीतून सोडवून सुखरूप घरी घेऊन येणारा हिरो, प्रेक्षकांच्या मनात आपली एक उत्तम प्रतिमा तयार करायचा आणि त्यांच्या प्रशंसेचा धनी व्हायचा…हळूहळू हे चित्र बदलले आणि केवळ शोभेची वस्तू म्हणून स्त्री भूमिकांचा विचार न करता स्त्रीवादी चित्रपटांना वाव देण्यात आला.
हिंदी सिनेसृष्टीत जणू स्त्रीवादी चित्रपटांची लाट आली. लज्जा, शक्ती – द पावर, मातृभूमी, जागो, डोर, नो वन किल्ड जेसिका, कहानी, इंग्लिश विंग्लिश, क्वीन, मर्दानी ही त्यातलीच काही नावे….या सगळ्याच चित्रपटांमधून स्त्रीच्या कतृत्त्वाला वाव देण्यात आला. हिंदी सिनेमांमध्ये स्त्रीवादी चित्रपटांची यादी वाढत असताना मराठीत त्याचा तितकासा विचार केला जात नव्हता. मात्र आता हे चित्र बदलते आहे. आपल्या चित्रपटातल्या पाचही हिरोंना इंगा दाखवत वायकॉम 18 मोशन पिक्चर्सची ही ‘पोश्टर गर्ल’ मराठी सिनेसृष्टीतले हे चित्र बदलण्यास सज्ज झाली आहे. स्त्रीशक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या या चित्रपटाची पोश्टर गर्ल आहे सोनाली कुलकर्णी…
आजपर्यंत ग्लॅमडॉल समजल्या जाणाऱ्या सोनालीच्या अभिनय शैलीला वाव देणारा हा चित्रपट…हा चित्रपट स्त्रीभ्रूण हत्येसारख्या भीषण वास्तव्यावर विनोदी अंगाने टिपण्णी करतो. चित्रपटभर तुम्हाला हसवणारी पोश्टर गर्ल, सिनेमागृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांना एक नवीन विचार देईल…
हा चित्रपट येत्या 12 फेब्रुवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.