सैफ अली खानने स्मिता तांबेला दिली शाबासकी, म्हणाला ‘तू खूप इंटेन्स एक्टरेस आहे’
सेक्रेड गेम्सचे दूसरे पर्व नुकतेच नेटफ्लिक्सवर लाँच झाले. ह्या बहुचर्चित वेबसीरिजच्या दूस-या पर्वात सैफ अली खानच्या सोबत अभिनेत्री स्मिता तांबेही झळकली आहे. न्यू-क्लिअर बॉम्बच्या साखळीला शोधण्यामध्ये सिनिअर इन्स्पेक्टर सरताज सिंगला मदत करणारी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट रमाच्या भूमिकेत स्मिता तांबे दिसून आलीय.
स्मिता तांबेच्या ह्या भूमिकेबद्दल सध्या तिचे खूप कौतुक होत आहे. पण को-स्टार सैफ अली खानने दिलेली कॉम्पलिमेन्ट तिच्यासाठी सर्वाधिक महत्वाची आहे. स्मिता ह्याविषयी सांगते, “सैफ अली खान यांची मी खूप वर्षांपासून चाहती आहे. पहिल्यांदाच मी त्यांच्यासोबत काम करत होते. ते खूप मनमिळावू स्वभावाचे आहेत. सीन सुरू नसताना ते खूप चेष्टा-मस्करी करत असतात. पण एकदा का सीन सुरू झाला, की मग भूमिका वठवताना ते एकदम गंभीर होतात. चित्रीकरणावेळी माझे काम पाहून तू खूप इंटेन्स एक्टरेस आहेस ही त्यांनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.”
स्मिता साकारत असलेली ‘रमा’, मुंबईतल्या शिवडी मध्ये कुटुंबासमवेत राहणारी, मुळची विदर्भातली दाखवली आहे. आपल्या कामाबद्दल प्रचंड निष्ठावान! अहोरात्र झोकून देऊन काम करणारी! २६/११ च्या हल्ल्यानंतर देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी ती पोलिसात भरती होते. मुंबईवर हल्ला करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचे गुप्त संदेश ‘डिकोड’ करताना ती दाखवली आहे.
नीरज घायवान ह्या दिग्दर्शकासोबतही स्मिताने पहिल्यांदाच काम केले. ती सांगते, “नीरज घायवान खूप शांत दिग्दर्शक आहे. तो खूप शांततेत काम करतो. अभिनेत्याला त्याच्या भूमिकेविषयी किंवा एखाद्या सीनविषयी समजावताना भारंभार माहितीने दाबून टाकत नाही. गरजेची असलेलीच माहिती देऊन त्यावर अभिनेत्यालाही काम करून देण्याची मोकळीक देतो. त्यामूळे आपल्या कामावर आपली वेगळी छाप उमटते.”