Marathi News

सायली आणि प्रणवच्या ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’

ATPADI NIGHTS  Marathi Movie
ATPADI NIGHTS Marathi Movie

सायली आणि प्रणवच्या ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ –  ‘आटपाडी नाईट्स’ २७ डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

‘आटपाडी नाईट्स’च्या वसंत बापूसाहेब खाटमोडेचा (प्रणव रावराणे) ‘रात्रीचा काहीतरी घोळ’ आहे याची सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. असे असले तरी वसंता आणि हरिप्रिया (सायली संजीव) यांच्यात जबरदस्त ‘जांगडगुत्ता’ जमून आल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या गाण्यामधून दिसत आहे. चित्रपटाच्या टीजर पाठोपाठ सायली आणि प्रणवचा ‘जांगडगुत्ता’ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर आहेत. प्रसिद्ध कवी नारायण पुरी यांच्या ‘प्रिये’ या कवितेने काही महिन्यांपूर्वी सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता. हेच नारायण पुरी मोबाईलच्या स्मॉल स्क्रीन नंतर आता थिएटरची बिग स्क्रीन गाजवायला तयार झाले आहेत. ‘आटपाडी नाईट्स’ या मराठी चित्रपटातून त्यांचे गीतकार म्हणून पदार्पण होत आहे. थोडक्यात सांगायचे तर ‘प्रिये’ नंतर ‘प्रेमाचा जांगडगुत्ता ग, जीव झाला खलबत्ता ग, उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग’ या ओळी तरुणाईला झिंगायला लावणार हे निश्चित.

‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या गीताला विजय गवंडे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायक आदर्श शिंदे आणि वैशाली माडे यांच्या खास शैलीतील गायकीमुळे या गाण्याला चार चाँद लागले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, या ठेका धरायला लावणाऱ्या गाण्याची लक्षवेधी कोरिओग्राफी राहुल ठोबरे आणि संजीव होवलदार यांनी केली आहे,

मायदेश मीडिया निर्मित ‘आटपाडी नाईट्स’ मध्ये प्रणव रावराणे, सायली संजीव, संजय कुलकर्णी, छाया कदम, समीर खांडेकर, आरती वडगबाळकर, योगेश इरतकर, विठ्ठल काळे, जतिन इनामदार, प्रशांत जाधव, शितल कलापुरे, चैत्राली रोडे, श्वेता परदेशी, बालकलाकार ओम ठाकूर, स्व. विवेक राजेश, डॉ. सुधीर निकम, अनुजा प्रभूकेळुसकर आणि सुबोध भावे यांच्या भूमिका आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे कथानक असलेला ‘आटपाडी नाईट्स’ येत्या २७ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button