Marathi News

“सचिन-अभिनय ची स्वारी स्वित्झर्लंडला रवाना” – अशी ही आशिकी चं शूटींग शेवटच्या टप्प्यात

Sachin Pilgaonkar & Abhinay
Sachin Pilgaonkar & Abhinay

आपल्या साठाव्या वाढदिवशी आपल्या चाहत्यांना नवा सिनेमा भेट देण्याचं आश्वासन देणाऱ्या सचिन पिळगांवकरांच्या “अशी ही आशिकी”चं शूटिंग शेवटच्या टप्प्यात पोहोचलं असून या चित्रपटाची दोन गाणी आणि काही भाग शूट करण्यासाठी या सिनेमातील मंडळी थेट स्वित्झर्लंडला रवाना झाली आहेत. स्वित्झर्लंडच्या नयनरम्य वातावरणात आपल्या मराठी सिनेमाचं शूटिंग करणारे सचिन पिळगांवकर हे पहिले दिग्दर्शक आहेत. नावातच आशिकी असणाऱ्या या सिनेमातून यंग आणि फ्रेश लव्हस्टोरी समोर येणार असून अभिनय बेर्डे या आशिकीचे रंग प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे तर अभिनयला प्रेमात पाडणाऱ्या सचिनजींच्या नायिकेमुळे मराठी सिनेसृष्टीला एका नव्या चेहऱ्याने समृध्द होणार आहे.

सचिन पिळगांवकर यांनी आपल्या सोशल मीडियावरून अभिनयसोबतचा सेल्फी शेअर करत “अशी ही आशिकी” च्या शूटिंग दरम्यान अभिनय चा एकंदर वावर लक्ष्याबरोबर घालवलेले ते “अशी ही बनवाबनवी” चे दिवस ताजे करून गेल्याचं म्हटलं आहे. हा चित्रपट १४ डिसेंबर ला प्रदर्शित होणार असून या निमित्ताने सरत्या वर्षात प्रेमाची नव्याने उजळणी होणार आहे.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, गायक, निर्माता अशा विविध भूमिकांमध्ये दिसलेले सचिन पिळगांवकर आता आपल्याला संगीत दिग्दर्शकाच्या ही भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शनातील अनोख्या शैलीने गेली कित्येक वर्ष मराठी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे सचिन पिळगांवकर या चित्रपटाच्यानिमित्ताने तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून आपल्या समोर येत आहेत. तर या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शनाबरकोबरच कथा-पटकथा-संवाद ही सचिनजींचेच आहेत.

सिलेक्ट मिडिया होल्डिंग्स आणि टी-सीरिज निर्मित अशी ही आशिकी चित्रपटाची सहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनी केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर या चित्रपटाच्या निर्मात्यांची भूमिका पार पाडत आहेत.

आतापर्यंत तब्बल 21 चित्रपटाचं दिग्दर्शन केलेले सचिन पिळगांवकर अशी ही आशिकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपल्या सिनेमातून आशिकीचे पैलू मांडणारे आहेत. चिरतारूण्याचं वरदान लाभलेल्या सचिनजींचा हा नवा पैलू पाहणं, प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button