सई ताम्हणकरने वृक्षारोपण करून साजरा केला आपला वाढदिवस !
सई ताम्हणकरचा वाढदिवस 25 जूनला असतो. यंदा सई वाढदिवसाच्या दिवशी आपला चित्रपट लव्ह सोनियाच्या प्रिमीयरसाठी लंडनला गेली होती. त्यामूळे तिच्या फॅन्सनी ती लंडनहून परतल्यावर तिच्यासोबत वाढदिवस साजरा केला.
सई आणि तिचा फॅनक्लब सईहोलिक्स दरवर्षी महाराष्ट्रातल्या एका गावात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करतात. यंदा त्यांनी पूण्याजवळच्या उरळीकांचनमध्ये वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
सईच्या सर्व चाहत्यांनी वृक्षारोपण झाल्यावर तिच्यासोबत केक कापून आणि तिला भेटवस्तू देऊन सईचा वाढदिवस साजरा केला. महाराष्ट्रभरातून सईचे 50हून जास्त चाहते वृक्षारोपण करण्यासाठी उरळीकांचनमध्ये एकत्र आले होते. विशेष म्हणजे, गिफ्टशॉपमधून सईसाठी भेटवस्तू न आणता प्रत्येकाने हॅंडमेड गिफ्ट्स सईला दिली. ज्यामूळे सई खूप भारावून गेली होती.
आपल्या भावना व्यक्त करताना सईचा फॅन अभिजीत मुरूडकर म्हणतो, “मी गेली दोन वर्ष सईहोलिक्सशी निगडीत आहे. आणि गेली 10 वर्ष सईचा फॅन आहे. जेव्हा मी वृक्षारोपणासाठी घरातून निघालो, तेव्हा माझ्या आईची प्रतिक्रिया खूप बोलकी होती. ती म्हणाली, आजपर्यंत हिरोईनच्या नादाला लागून लोक फुकट जातात असं ऐकलं होतं. पण माझ्या मुलावर तर चांगले संस्कार होताना मी पाहतेय. आम्हांला आमच्या घरच्यांकडून आणि मित्रमैत्रिणींकडून अशा उपक्रमांसाठी पाठिंबाच मिळतो.”
सईहोलिक्ससोबत वाढदिवस साजरा केल्यावर सई म्हणाली, “भेटवस्तू देऊन आणि केककटिंग करून तर सगळ्याच सेलेब्सचे चाहते वाढदिवस साजरा करतात. पण मला खूप अभिमान आहे की, माझे चाहते समाजोपयोगी उपक्रमातून माझा वाढदिवस साजरा करतात. आणि अभिजीतच्या आईच्या प्रतिक्रियेने तर मला हुरूप आला. माझी इच्छा आहे, माझ्या चाहत्यांनी असे उपक्रम वारंवार राबवावेत. माझा त्यांना नेहमीच पाठिंबा असेल.”