संजय दत्तने त्याची पहिली निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘बाबा’चा ट्रेलर केला प्रदर्शित
संजय दत्त प्रॉडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सनिर्मित ‘बाबा’ होणार २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित
प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाची सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज दस्तुरखुद्द संजय दत्तच्या हस्ते प्रदर्शित झाला आणि चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीच ताणली गेली. हा चित्रपट आगळ्या अशा कथेवर तर बेतलेला आहेच, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड लाभली असल्याच्या पाऊलखुणा या ट्रेलरच्या माध्यमातून उमटतात. त्यामुळे प्रतीक्षा लागते ती चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेची, २ ऑगस्टची.
आज गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून संजय दत्त यांनी “बाबा” ह्या त्यांच्या ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सबरोबर निर्मित पहिल्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर जुहू येथील पीव्हीआर सिनेमाज येथे संजय दत्तसह दीपक दोब्रीयाल, नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर,शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी, दिग्दर्शक राज आर गुप्ता, निर्माते मान्यता दत्त आणि अशोक सुभेदार यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकार आणि सर्व तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदर्शित केला.
चित्रपटाची सहनिर्मिती ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’बरोबर ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक आणि आरती सुभेदार यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझर आणि पोस्टरला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद लाभतो आहे. ‘अडगुलं मडगुलं‘ या गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या पहिल्या गाण्यालाही रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि इतर भाषेतील चित्रपटसृष्टींमध्येही चित्रपटाचा बोलबाला आहे. आज संजय दत्त आणि संपूर्ण चमूने चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आणि चित्रपटाची जातकुळीच वेगळी आहे, याची शाश्वती पटली.
एका ऐकू-बोलू न शकणाऱ्या जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षांच्या बोलू न शकणाऱ्या मुलाची ही कथा आहे. एका छोट्याशा गावात आपल्या छोट्याशा विश्वात हे कुटुंब खुश आहे.
पण अशातच एक वादळ त्यांच्या आयुष्यात येते. एक उच्चभ्रू जोडपे त्यांच्या घरी येते आणि त्यांच्या मुलावर आपला हक्क सांगते. स्थानिक पोलीस हस्तक्षेप करतात आणि त्यांना मुलावरील हक्क कोर्टात शाबित करून आणायला सांगतात.
त्यातून पुढे काय होते? बाबा सर्व संकटांवर मात करून आपल्या मुलाला त्या कायदेशीर लढाईत जिंकतो कि त्याला हार मानावी लागते, हे अनुभवण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट रसिकांना पाहावी लागणार आहे. २ ऑगस्ट रोजी निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात चित्रित झालेला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले असून निर्मिती ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’ आणि ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ची आहे.
संजय दत्त यांनी काही आठवड्यांपूर्वी ट्वीट करत या चित्रपटाची घोषणा केली होती आणि त्यानंतरही वेळोवेळी चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ते म्हणाले, “बाबा’ हा आमचा पहिला मराठी चित्रपट माझ्या आयुष्यात खंबीरपणे जे माझ्या मागे उभे राहिले अशा व्यक्तीला समर्पित करत आहे! लव्ह यू डॅड! आमच्या ‘बाबा‘ या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले असून, यामध्ये बाबा आणि मुलाच्या आयुष्यातील मजेदार नात्यातील गमती-जमती पाहायला मिळणार आहेत.”
मान्यता दत्तने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले, “आमचा पहिला मराठी चित्रपट आम्ही सुनील दत्त साहेबांना समर्पित करत आहोत. त्यांच्या खंबीर पाठींब्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावत गेला!” त्यानंतर पहिल्या गाण्याच्या प्रदर्शानंतर तिने म्हटले, “आमच्या ‘बाबा’ या चित्रपटातील माझे सर्वात आवडते ‘अडगुलं मडगुलं‘ हे गाणे प्रदर्शित झाले असून, मला विश्वास आहे कि हे गाणे तुम्हाला देखील खूप आवडेल”.
‘बाबा’मध्ये ‘तनु वेडस मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्याबरोबर नंदिता पाटकर प्रमुख भूमिकेत आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी,जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. याआधी त्यांनी ‘धागा’ या झी5 वर प्रदर्शित झालेल्या मराठी लघुपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे.
‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’चे अशोक सुभेदार यांनी ट्रेलरच्या प्रदर्शनाच्यावेळी आपली उत्कंठा व्यक्त केली. या चित्रपटाच्या निर्मितीमागील कथा सांगताना ते म्हणतात, “ह्या चित्रपटाच्या मनिष सिंगने लिहिलेल्या मूळ कथेला राज गुप्ता यांचे उत्तम दिग्दर्शन लाभले आहे. बाप आणि मुलाची ही एक सुंदर अशी कथा आहे. कोकणातल्या निसर्गरम्य चित्रीकरणामुळे ते अधिकच खुलले आहे. याची कथा प्रत्येक वयोगटातील प्रत्येक रसिकाला खिळवून ठेवेल आणि त्याला भावूक करेल, यात शंका नाही.”
दिग्दर्शक राज आर गुप्ता यांनी म्हटले, “माझे असे ठाम मत आहे कि भावनांना भाषा नसते. हा संदेश या चित्रपटातील कलाकारांनी अगदी सुंदररित्या अधोरेखित केला आहे. एक कुटुंब सर्व आव्हानांवर मात करत एकत्र राहण्यासाठी कशी धडपड करत असते, याची ही एक आंबट-गोड कथा आहे.”
‘Baba’ Marathi Movie Trailer Link-