Marathi News
शासन ( चित्रपटात भरत नेगेटिव्ह भूमिकेत
शेखर पाठक प्रस्तुत आणि निर्मित शासन हा सिनेमा राजकारणावर भाष्य करणारा आहे. राजकारण हा एक असा खेळ आहे की यात सगळेजण भाग घेण्यास उत्सुक असतात. आणि या खेळात जिंकण्यासाठी वाटेल ते करायची तयारी या खेळात सहभागी झालेल्या राजकारण्याची असते. व्यासायिक नाट्यरंगभूमीवरून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या भरतने प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर निर्माण केल आहे. आपल्या विविधांगी अभिनयातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा भरत शासन चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळणार आहे. भरत हा अष्टपैलू अभिनेता आहे, त्याने आता पर्यंत आपल्याला अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवलं आहे… मात्र शासन या चित्रपटात त्याने साकारलेली नेगेटिव्ह शेडची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशीचं आहे. सत्तेच्या लोभासाठी वाटेल ते करणारा राजकारणी भरतने रंगवला आहे.
श्रेया फिल्म्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमात भरत जाधव याच्यासह मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी. मनवा नाईक, अदिती भागवत, वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले, मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ, श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.
आपल्या विशिष्ट दिग्दर्शकीय शैलीसाठी प्रसिद्ध असणारे गजेंद्र अहिरे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून कथा,पटकथा आणि संवादही लिहिले आहेत. राजकारणामध्ये आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असेलेला युनिअन लीडर अशाच उद्भवलेल्या एका परिस्थितीचा फायदा कसा करून घेतो असं काहीसं कथानक या सिनेमाच आहे. नरेंद्र भिडे यांनी सिनेमाला संगीत दिलं असून जसराज जोशी आणि जयदीप वैद्य यांनी गाणी गायली आहेत. महाराष्ट्रासह गोव्यात हा चित्रपट प्रदर्शित होणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .