रमेश – सुरेशचा टेक्नो-सॅव्ही अंदाज पहा ‘पोश्टर गर्ल’मध्ये
जाहीरातीतून आपल्या अनोख्या शैलीचे प्रदर्शन करत भारतभर नावलौकिक मिळवणारी रमेश – सुरेशची जोडी पोश्टर गर्लमधून पुन्हा एकदा आपल्या समोर येते आहे. या चित्रपटात आपण रमेश – सुरेशचा टेक्नोसॅव्ही अंदाज पाहू शकणार आहोत. रमेश च्या भूमिकेत अक्षय टंकसाळे आपल्याला दिसणार आहे, तर अनेक नाटक, सिनेमातून आपल्या चेहऱ्याची कळी खुलवणारे संदीप पाठक यांनी सुरेशची भूमिका साकारली आहे.
यडगावकर पाटलांच्या घरात जन्माला आलेले हे जुळे पुत्र…डिजीटल भारताची खरीखुरी ग्रामीण प्रतिमा आपल्यासमोर उभी करायला सज्ज झाले आहेत. वायकॉम18 मोशन पिक्चर्स निर्मित आणि चलो फिल्म बनायें प्रस्तुत ‘पोश्टर गर्ल’ने स्वयंवराचा निर्णय घेतला आणि पारगाव टेकवडे गावातले सगळेच तरूण बोहल्यावर चढले. ‘एक नार कैक बेजार’ अशी परिस्थिती गावात निर्माण झाल्यामुळे त्यातल्या त्यात बरे उमेदवार निवडण्याची जबाबदारी काकांच्या मबजूत खांद्यांवर येऊन पडली. या काकांच्या दमदार भूमिकेत ऋषिकेश जोशी आपल्याला दिसणार आहेत. त्यांनी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांपैकी एक हे रमेश – सुरेश…
पाटील घराण्यात जन्माला आलेल्या रमेश – सुरेश ला टेक्नोलॉजीचे भारी वेड…आणि याच वेडापायी पारगाव टेकवडे गावात कोणतीही नवीन टेक्नोलॉजी सर्वप्रथम या पाटलांच्याच घरी येते… भारतराव झेंडे (जितेंद्र जोशी), बजरंग दुधभाते (अनिकेत विशवासराव), अर्जुन कलाल (सिध्दार्थ मेनन) नंतर आता रमेश – सुरेश (अक्षय टंकसाळे-संदीप पाठक) हे सवयंवरातले शेवटचे उमेदवार…
आता या पाच जणांपैकी पोश्टर गर्ल नक्की कोणाला पसंत करते हे कळेल येत्या 12 फेब्रुवारीला तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात…