Marathi News

’मेकअप’मध्ये रिंकू -चिन्मयची फ्रेश जोडी गणेश पंडित यांचे दिग्दर्शनात पाऊल

Rinku Rajguru & Chinmay Udgirkar
Rinku Rajguru & Chinmay Udgirkar

 

आपल्या अनोख्या लेखनाने, अभिनयकौशल्याने गणेश पंडित यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा नावलौकिक कमावल्यानंतर आता गणेश पंडित एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. निर्मित आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत ‘मेकअप’ या चित्रपटातून गणेश पंडित यांनी आपले पाऊल दिग्दर्शनाकडे वळवले आहे. काही महिन्यांपूर्वी ‘मेकअप’ या चित्रपटाचा पहिला टिझर प्रदर्शित झाला होता. त्याची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता या चित्रपटाचा दुसरा टिझर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून या धमाल टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग निर्मित आणि केतन मारू, कलीम खान सहनिर्मित या चित्रपटात रिंकू राजगुरू हिची प्रमुख भूमिका असून टिझरमध्ये चिन्मय उदगीरकरही दिसत आहे. रिंकूची यात दोन भिन्न रूपे पाहायला मिळत आहेत. या चित्रपटातही रिंकूचा बिनधास्त अंदाज दिसत असून तिचा हा ‘मेकअप’ कशासाठी आहे, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. रिंकू आणि चिन्मयच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी पाहायला मिळेल. चित्रपटाचे लेखन गणेश पंडित यांनी केले असून वेगवगेळे विषय हाताळण्यात, काहीतरी नाविन्यपूर्ण देण्यात गणेश पंडित यांचा हातखंडा आहे. त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की. ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button