Marathi News
महेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’मध्ये धमाल

अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी ओळख निर्माण करुन आणि चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांतून आपल्या बिनधास्त कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी व्यक्ती म्हणजे महेश मांजरेकर.
मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये महेश मांजरेकरांनी स्वत:च्या मेहनतीने आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या मराठी इंडस्ट्रीत महेशजी यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचे व्यक्तिमत्त्व कितीही रोखठोक असले तरी ते शांत स्वभावाचे आहेत. अनेकांना बहुदा त्यांची भितीही वाटत असेल पण महेशजी मनाने खूप प्रेमळ आहेत. ज्या व्यक्तिला मार्गदर्शनाची गरज आहे त्याला योग्य पध्दतीने मार्गदर्शन देणा-या महेशजींनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. काही भूमिका या गंभीर आहेत तर काही अगदी हलक्या-फुलक्या पण मनोरंजक.
नवीन वर्षाच्या दुस-या महिन्याच्या सुरुवातीलाच महेश मांजरेकर एक मस्त-जबरदस्त-भन्नाट भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात महेश मांजरेकर यांनी ‘गडबडे बाबा’ या एका ‘कूल’ साधूची भूमिका साकारली आहे. भाविकांच्या मनातील प्रश्नांचे-शंकेचे ‘अगदी हटके स्टाईल’ने निरसन करणारे गडबडे बाबा या चित्रपटात एक से बढकर एक अफलातून डायलॉगने धुमाकूळ घालणार आहेत याचा अंदाज नुकतेच रिलीझ झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमधून आलाच असेल. प्रेम-लग्न यांविषयी गडबडे बाबांचे असणारे अचूक भाकीत आणि विचार हे प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच करणार. महेश मांजरेकर ब-याच दिवसांनंतर अशा हलक्या-फुलक्या भूमिकेत दिसणार आहेत.
महेशजी यांच्यासह या चित्रपटात सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
आयुष्य व्यर्थ घालवायचे नसेल तर प्रेम करा आणि गडबडे बाबांचे भाकीत अन् भावनेविषयी विचार जाणून घ्यायचे असेल तर नक्की पाहा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपट येत्या १ फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.