News

महिला दिना बद्दल मराठी तारकांनी मांडली मते

Kranti Redkar

 

स्त्री जन्माचा गर्व बाळगा

नॉर्मली, अनेक बायका ‘पुढच्या जन्मी बाईचा जन्म नको’ अशी प्रार्थना करताना दिसतात. पण मी म्हणेन कि ‘मिळालेल्या या स्त्री जन्माचा आपण गर्व करायला हवा. कारण एकाहून अधिक भूमिका निभावणारी स्त्री हि एकमेव व्यक्ती आहे. मुलगी, बहिण, प्रेयसी, मैत्रीण, बायको, सासू आणि सून अशा अनेक भुमिकेत ती जगत असल्यामुळे, माझ्यादृष्टीने स्त्री जन्म म्हणजे एका कलाकाराचा जन्म आहे. खरे पहिले तर, एका स्त्रीची सर्वात मोठी वैरीण एक स्त्रीच असते,  ‘या गोजिरवाण्या घरात’ हे माझे नाटक स्त्रीसक्षमीकरणावर भाष्य करते. आपल्या सुनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी तिची सासू तिच्या पाठीशी खंबीर उभी राहते. आजच्या आधुनिक विचारसरणीच्या युगात हेच सूत्र प्रत्येक स्त्रीने अवलंबवायला हवे. तेव्हाच स्त्री जन्माचा विकास होईल, आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्यात बदल करायला हवा, एका स्त्रीच्या पाठीशी एका स्त्रीनेच खंबीर उभे राहायला हवे.करण त्यामुळेच समाजातील अर्ध्या अधिक समस्या या दूर होतील. जेणेकरून ‘पुढच्या जन्मी मला बाईचाच जन्म दे’ अशी प्रत्येक स्त्री देवाकडे साकडे घालू शकेल.
सुप्रिया पाठारे-  (अभिनेत्री)
____________________________________________________________
 ३६५ दिवस महिलादिन असल्यासारखेच जगा
आजची स्त्री ही आधुनिक विचारांची आहे, चूल आणि मुल यासोबतच स्वतः च्या पायावर देखील ती उभी आहे. त्यामुळे स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची क्षमता तिच्याकडे आहे. आज मी माझ्या खाजगी आयुष्यात माझ्या कामाबरोबरच बायको, सून, आई आणि आजी अशा अनेक भूमिका बजावते आहे, अर्थात, आजची प्रत्येक महिला ते करीत आहे. सध्या ती काळाची गरज देखील बनली आहे अशावेळी नोकरी किवा व्यवसाय करताना आपल्या प्राथमिक जबादारी देखील सांभाळता आली पाहिजे. आपले काम आणि जबाबदाऱ्या यातून सुवर्णमध्य आपल्यालाच काढायला हवा. नातेसंबंधांना न दुखावता आपले अस्तित्व देखील उभे करता येऊ शकते. आवड झोपासण्यासाठी वयाची बंधने लागत नाही, कोणत्याही वयात आपण काहीही शिकू शकतो. माझ्या ‘के दिल अभी भरा नही’ आणि ‘गोष्ट तशी गम्टची या दोन नाटकातील माझ्या भूमिका महिलांना हेच संदेश देतात. कौटुंबीक जबाबदा-या बरोबरच स्वतः कडे लक्ष द्या. तसेच केवळ एकदिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा वर्षातील ३६५ दिवस महिलादिन असल्या सारखेच जगा, आयुष्य सुंदर होईल.
लीना भागवत. (अभिनेत्री )
_______________________________________________________________
 
महिला दिन तमाम ‘गृहिणी’ साठी खास असायला हवा.
मी २१ व्या शतकातील स्त्री असून माझी विचार करण्याची पद्धत आधुनिक आहे. आज महिलांनी चाकोरीबद्ध विश्वातून आपले अंग काढले आहे, अनेकांनी यशाची शिखर देखील गाठली आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने या सर्व यशस्वी महिलांचे मी अभिनंदन करते. पण कितीही उंचीवर जा पाय जमिनीवरच ठेवा, असा सल्ला मी माझ्या मैत्रिणींना देईल. आपली प्रगती आपल्या सभोवताली असणा-या हितचिंतकांमुळे आणि आप्तेष्टांमुळे होत असते, त्यामुळे त्यांना डावलून कसे चालेल. तसेच पुरुषांनी देखील आपल्या बायकोला तसेच नात्यांतील कोणत्याही स्त्रीला समान दर्जा द्यायला हवा. कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी फक्त स्त्रीची नाही आहे, पुरुषांची देखील तेवढीच आहे. संसाराचा गाढा दोन्ही चाकेवर समान चालायला हवा, माझ्या आगामी ट्रकभर स्वप्न या कौटुंबिक सिनेमात अशीच एक सामान्य स्त्रीची कथा आहे. जी भारतातील प्रत्येक घराघरात असलेल्या एका सामान्य स्त्रीचे प्रतीनिधीत्व करते. यंदाचा महिला दिन तमाम ‘गृहिणी’ साठी विशेष आणि खास असायला हवा.
क्रांती रेडकर (अभिनेत्री)
___________________________________________
माणूस म्हणून एकमेकांचा आदर करणे महत्वाचे
महिला दिन हा फक्त स्त्रियांसाठीच महत्वाचा असतो असे मी मानत नाही. तर पुरुषांसाठी सुध्दा हा दिवस विशेष ठरू शकतो. स्त्री असो वा पुरुष असो, या दोन्ही नैसर्गिक रचना असून, केवळ शारीरिक बदल वगळता या दोन्हीही व्यक्ती शेवटी माणूसच असतात. त्यामुळे या दिवसापासून तरी सगळे भेदभाव बाजूला सारून आधी आपण एक माणूस आहोत याची जाणीव प्रत्येक स्त्री-पुरुषाने स्वत:ला करून द्यायला हवी. महिला म्हणजे अबला नारी किवा पुरुष म्हणजे एक सशक्त व्यक्तिमत्व असे सगळे भेदभाव कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. कारण जेव्हा पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल तेव्हाच काहीतरी सकारात्मक गोष्ट हाताशी येऊ शकेल. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला सगळ्यांना हीच एक आठवण करून द्यायची आहे की, स्त्री आणि पुरुष म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून एकमेकांचा आदर करा.
नेहा महाजन – अभिनेत्री
__________________________________
संस्कारातूनच समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तयार होतो
पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असे नेहमीच म्हटले जाते, आणि ते खरेदेखील आहे. त्यामुळे स्त्रीचे महत्व खूप मोठे आहे.मात्र, आपल्या इथे विविधकारणांमुळे तिला पुरुषांपेक्षा कमी लेखले जाते, तिच्यावर बंधने लादली जातात. तिच्या कपड्यावरून, वागण्या-बोलण्यावरून दुषणे ठेवली जातात. हे चुकीचे असून, तिच्यावर मर्यादा लादण्यापेक्षा समाजाची तिच्याकडे पाहण्याची वृत्ती बदलायला हवी. आज मुलीदेखील मुलांप्रमाणे घर चालवू शकतात, त्यामुळे प्रत्येक घराघरात होत असलेला भेदभाव थांबायला हवा. पालकांनी आपल्या पाल्यांना वाढवताना मुलगा किवा मुलगी असा फरक करता कामा नये. कारण घरगुती संस्कारातूनच माणसाचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तयार होत असतो, त्यामुळे लहानपणापासूनच स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य मनात बिंबवणे महत्वाचे ठरेल. ‘कामयाबी ना लडका देखती हे ना लडकीया, कामयाबी सिर्फ सोच देखती हे’ असा संदेश देणारी अमीर खानची जाहिरात सगळीकडे झळकत आहे. हि जाहिरात समाजात काही सकारात्मक बदल घडून आणण्यास महत्वाची ठरेल, अशी मी आशा करते.
रीना अगरवाल – अभिनेत्री 
_______________________________________________________
एक माणूस म्हणून तिला देखील स्वच्छंदी जगू द्या ! 
आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. आई, माता, जननी अशी अनेक विशेषण तिला लावली जातात, पण त्यामुळे तिच्या अडचणी, गरजा तसेच तिच्या इच्छा सगळ्याच पूर्ण होतात असे नाही. आजची स्त्री आधुनिक विचारांची असून, तिला स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला धडपडावे लागत आहे. एवढेच नव्हे तर, घराघरातील सामान्य गृहिणीला देखील तिच्या हक्कासाठी लढाव लागत आहे. त्यामुळे या सर्व महिलांना आपल्या अडचणी निसंकोचपणे व्यक्त करून देणारे मुक्त व्यासपीठ उपलब्ध व्हायला हवे. ज्यात महिलांच्या अडचणींचा, त्यांच्या आवडीनिवडीचा विचार होऊ शकेल. मी सुद्धा एक महिला असल्याकारणांमुळे, स्त्रीची मानसिकता जाणू शकते. त्यामुळेच तर माझ्यापरीने मी सामान्य महिलांच्या हृदयात आपुलकीची साद घालण्याचा प्रयत्न माझ्या ‘द मुक्त बर्वे शो’ या माय एफ.एम. रेडियो वाहिनी द्वारे करीत आहे. मुळात, अशाप्रकारे स्त्रीविषयांवर आधारित अनेक कार्यक्रम बनायला हवेत. जेणेकरून ‘स्त्री’ या व्यक्तिमत्वाला चांगल्या प्रकारे ओळखता येऊ शकेल. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी हे सांगू इच्छिते कि, स्त्रीला व्यक्त होऊ द्या, तिच्या मनात दडलेल्या अनेक गोष्टींना वाट करून द्या, आपले छंद झोपासण्याचा तिला देखील अधिकार असून, एक माणूस म्हणून तिलादेखील स्वच्छंदी जगू द्या !

मुक्ता बर्वे – अभिनेत्री 

__________________________________________________
मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज
जच्या काळात महिला सुरक्षा हा एक अतिशय संवेदनशील विषय असल्यामुळे त्याकडे सगळ्यांनीच गांभीर्याने बघण्याची खूप गरज आहे. अल्पवयीन मुलीवर होत असलेल्या बलात्काराच्या बातम्या ऐकल्या तर मन हेलावून जाते. माझ्या आगामी ‘ती आणि इतर’ या सिनेमात देखील हि वास्तविकता दर्शविण्यात आली आहे. कुठे अत्याचार होताना दिसत असेल तर आपण त्यावर बोलायला हवे. लहानपणापासूनच शाळांमध्ये बाकी विषयांप्रमाणे मुलीना स्वसोरक्षणाचे धडे चालू केल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो. एवढेच नाही तर शारीरिक शक्ती सोबत मानसिक बळही खूप महत्वाचे असते. त्यामुळे योगा,ध्यान ह्या गोष्टी मुलींना जर लहान पण पासूनच शिकवण्यात आल्या तर त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. त्याचप्रमाणे लहानपणापासूनच मुलगी म्हणेज असुरक्षित, कमजोर, प्रतिकार न करू शकणारी असे सगळे विचार मुलींच्या मनात बिंबवणे कुठेतरी थांबले पहिजे. म्हणूनच जागतिक  महिला दिनाच्या निमित्ताने मी सगळ्या महिलांना हेच सांगू इच्छिते, खंबीर बना, स्वत:च्या स्वसंरक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आणि नेहमी सावधान रहा.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button