Marathi News

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’च्या ‘हॉटेल’ थीममध्ये असणार एकापेक्षा एक सरस स्किट्स

 

भन्नाट, विनोदी स्किट्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व-२’ने  आठवड्यातील चार दिवस राखीव ठेवले आहेत. आठवड्याची सुरुवात धमाल पध्दतीने करणारा या कार्यक्रमाचा पहिला फॉरमॅट म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’. या फॉरमॅटमध्ये गेल्या दोन आठवड्यात वेगवेगळ्या थीमवर आधारित कॉमेडी स्किट्स कलाकारांनी सादर केले आणि या कार्यक्रमाचे जज महेश कोठारे यांनी देखील हे स्किट्स एन्जॉय करत कलाकारांच्या विनोदी अभिनयाला दाद दिली.
आता पुढील आठवड्यात या फॉरमॅटमध्ये म्हणजेच सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी खास पाहुणे कलाकारांच्या उपस्थितीत ‘हॉटेल’ या थीमवर कलाकार स्किट परफॉर्म करणार आहेत. या थीममध्ये ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्याचा नेमका काय संबंध आणि अन्न बचत करणारी खानावळ, हर हर भोजनालयची मुलाखत अशा ब-याच धमाल करणा-या स्किट्स प्रेक्षकांना पुढील आठवड्यात पाहायला मिळणार आहेत.
‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या आगामी मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार सिध्दार्थ जाधव आणि सौरभ गोखले या कार्यक्रमात उपस्थितीत राहणार असून ते हास्यजत्रेत हसत-हसत सामिल होणार आहेत. एका नवीन कलाकाराच्या छोटाशा परफॉर्मन्समुळे सिध्दार्थने भावूक होऊन त्याचा करिअर मधला पहिला अनुभव या मंचावर सर्वांसोबत शेअर केला.
समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, अरुण कदम, अंशुमन विचारे आणि त्यांच्या सोबतीला ८ नवीन कॉमेडीयन्स यांच्या परफॉर्मन्सला ‘वाह! वाह! कमाल…’ अशी दाद सिध्दार्थ जाधव आणि सौरभ गोखले यांनी दिली. हास्याचे डबल डोस देणारी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व-२’ची मजा लुटा फक्त सोनी मराठीवर.

Related Articles

Leave a Reply

Back to top button