मराठी चित्रपट निर्मितीमध्ये सातत्य राखणारे अनिश जोग आणि रणजीत गुगळे – आगामी ‘धुरळा’ हा सहावा चित्रपट
चित्रपट मग ते हिंदी असो कि मराठी, यशाचे प्रमाण किंवा यशस्वी चित्रपटांची संख्या नेहमीच अपयशी चित्रपटांच्या तुलनेत कमी असते. चित्रपटाच्या अपयशाची अनेक कारणे असतात, त्या पैकी एक म्हणजे निर्माते एका चित्रपटानंतर पुन्हा निर्मितीकडे फिरकत नाहीत, याला अपवाद फार कमी निर्माते आहेत; त्यापैकी एक जोडी म्हणजे अनिश जोग आणि रणजीत गुगळे. या दोघांनी ‘डबलसीट’, ‘मुरांबा’, ‘गर्लफ्रेंड’ नंतर आता ‘धुरळा’ या चित्रपटाची निर्मिती करत एक राजकीयपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
अनिश जोग यांनी आपल्या कामाची सुरुवात जाहिरातपटापासून केली असली तरी पुढे वेगळी वाट निवडत नाट्य, चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. ‘नवा गडी, नवं राज्य’ या नाटकाच्या निर्मिती नंतर त्यांनी याच कथेवर आधारीत ‘टाइम प्लीज’ चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्यांनतर ‘डबलसीट’, ‘वाय झेड’, ‘मुरांबा’, ‘गर्लफ्रेंड’ असे वैविध्यपूर्ण चित्रपट केले.
चित्रपट क्षेत्राशी दुरान्वयानेही संबध नसलेल्या कुटुंबातून रणजीत गुगळे आले आहेत. मात्र नाटकांची आणि सिनेमाची आवड, त्यातून चित्रपट व्यवस्थापन क्षेत्रात सूर गवसल्याने त्यांनी अनेक शॉर्टफिल्म आणि नाटकानंतर ‘टाइम प्लीज’ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून काम केले, नंतर चित्रपट निर्मितीच्या दिशेने आपली पाऊलं वळवत ‘डबलसीट’, ‘मुरांबा’ आणि ‘गर्लफ्रेंड’ ची निर्मिती अनिश जोग यांच्या सोबत केली. तसेच रणजीत यांनी ‘इल्युजन इथेरिअल स्टुडीओ एलएलपी’च्या माध्यमातून पंकज सोनवणे, विवेक जांबळे, भूषण हुंबे यांच्या साथीने हॉलीवूड, बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत व्हीएफएकस आणि स्पेशल इफेक्ट्स मध्येही आपला ठसा उमटविला आहे.
आजच्या युवा पिढीला आवडतील अश्या चित्रपट निर्मिती करण्यामागचे रहस्य उलगडताना अनिश जोग आणि रणजीत गुगळे म्हणाले की, चित्रपटाचा विषय आमच्यापुढे आल्यावर लेखक, दिग्दर्शक अनुभवी आहे की नाही याचा विचार न करता आम्ही कथेचा विचार करतो, त्या चित्रपटाचा कंटेंट किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि दिग्दर्शकाचे व्हिजन आमच्यासाठी अधिक महत्वाचे असते. तसेच आम्ही चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनसह प्रमोशनवर अधिक काम करतो कारण चित्रपटाचे निर्मितीमूल्य, तांत्रिक दर्जा जपत ज्या प्रेक्षकांसाठी आपण चित्रपट तयार केला त्यांच्या पर्यंत पोहोचणे अधिक महत्वाचे आहे.
दरम्यान, चित्रपट निर्मितीमधील सातत्याबद्दल बोलताना अनिश आणि रणजीत यांनी सांगितले की, चित्रपट निर्मिती हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे असे आम्ही मानतो, आमचे इतर काही व्यवसाय असले तरी त्यात आम्ही अडकून न पडता चित्रपट निर्मितीला वाहून घेतले आहे यामुळे आम्हाला चांगले विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात यश आले. आमच्या यशामागे उत्तम कथेची दर्जात्मक निर्मिती आणि योग्य प्रमोशन यांचा महत्वपूर्ण वाटा राहिला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजपर्यंतच्या आमच्या चित्रपटांचा चेहरा हा सातत्याने शहरी आहे, ‘धुरळा’च्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच थेट राजकीय विषयाला हात घातला आहे, राजकारणात शहर, गाव असा भेद नसतो यामुळे हा चित्रपट सर्वस्तरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास वाटतो.