Marathi News

नाट्यगृहांत सुविधांचा अभाव

fugay
रंगकर्मींमध्ये नाराजी कुठे उंदरांचा सुळसुळाट, तर कुठे दरवाजांना कड्या नाहीत, कुठे स्वच्छतागृहच अस्वच्छ

काही दिवसांपूर्वी अभिनेता सुमित राघवन यांनी फेसबुक या सोशल साईटवर एक व्हिडियो शेअर केला आणि अवघ्या नाट्य व कला सृष्टीत चर्चेचा विषय ठरलाय. त्याचे झाले असे कि काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त सुमित आणि चिन्मयी राघवन हे दोघे डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात गेले असता, त्यांना व्हीआयपी रूममध्ये बसण्याची सोय करण्यात आली. मात्र हि व्हीआयपी रूम अगदीच दुरवस्थेत होती. तेथे कुबट असा वासही येत होता. यावर उपरोधिक असा व्हिडियो सुमित याने सोशल साईटवर टाकला. आणि समस्त नाट्यसृष्टीतून नाराजीचा एकच सूर उमटला आहे. नाट्यगृहातील या असुविधांविषयी रंगकर्मींनी खेद व्यक्त करत खटकणार्या बाबींवर प्रकाश टाकला आहे. याच मुद्द्यावरच्या या काही प्रातिनिधीक प्रतिक्रिया…

लोकांना स्वच्छतेचं महत्त्व केव्हा पटेल कोण जाणे? – वैभव मांगले, अभिनेता
मुंबई आणि मुंबई बाहेरची सगळी नाट्यगृह कुठल्या ना कुठल्या प्रकारे वाईट आहेत. कुठे ध्वनी व्यवस्थित नाही, तर कुठे स्वछतागृह चांगली नाहीत. काही ठिकाणी मेकअप रूम उबट-कुबट वासाने भरलेली असते तर काही ठिकाणी थिएटरचं व्यवस्थित नाही. कुठे रंगमंच व्यवस्थित नाही. मुख्य समस्या हि स्वछतागृहांचीच आहे. ती कधीच स्वच्छ नसतात. मुळात या समस्येविषयी कुणालाच काही पडलेली नाहीये. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. रेल्वे स्थानक असो किंवा नाट्यगृह सगळीकडे अस्वच्छताच असते आपल्याकडे. अजून किती वर्ष जाणार आहेत स्वच्छतेचं महत्त्व पटायला कोण जाणे?

 स्वच्छता राखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी – शिल्पा नवलकर, लेखिका / अभिनेत्री
संपूर्ण महाराष्ट्रातीलच नाट्यगृहांची दुरवस्था आहे. आमच्या ‘सेल्फी’ नाटकाचा प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहात प्रयोग सुरु असतानाच हातभर मोठी असलेली एक पाल अचानक तेथे स्टेजच्या मध्यभागी ठेवलेल्या टेबलावर पडली. आणि त्यामुळे काही काळ प्रयोग थांबवावाच लागला. विले पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात तर डासांचा हौदोस असतो. अगदी स्टेजवरसुद्धा त्यांचा त्रास जाणवत असतो. कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहातील मेकअप रूमच्या पडद्यावरच रहात असलेल्या उंदराशी तर मैत्रीच होते आपली. सुरुवातीला अत्यन्त सुंदर आणि सुशोभित असलेले नाट्यगृह काही काळानंतर अत्यन्त वाईट अवस्थेत असते. प्रयोगाच्या आधी मेकअप रूममध्ये गेल्यावर पहिले काम करावे लागते ते म्हणजे आरसा साफ करणे. त्यानंतर तेथील खुर्ची व्यवस्थित असेल तर त्यावरची धूळ पुसावी लागते. हि मुंबई-पुणे येथील नाट्यगृहांची अवस्था आहे. तर महाराष्ट्राबाहेर काय अवस्था असेल हा विचार न केलेलाच बरा. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणच्या नाट्यगृहांमध्ये महिलांना कपडे बदलण्यासाठी असलेल्या रूमचे दरवाजेही लागत नाहीत. खिडक्या तुटलेल्या, त्यावर पडदा नाही, अशा परिस्थितीत कपडे कसे बदलायचे? त्याचबरोबर प्रयोगात एक-एक सेकंदही महत्त्वाचा असतो. एका विंगेतून दुसऱ्या विंगेत जाताना तेथील लाद्यासुद्धा उखडलेल्या अवस्थेत असतात. त्यावेळी अंधारात अनेकदा पायाला लागतंसुध्दा. एका नाट्यगृहात तर मेकअप रूमच्या एका संपूर्ण भिंतीवर लिपस्टिकचे  डाग होते. हि कलाकार आणि नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, नाट्यगृह स्वच्छ ठेवण्याची. आम्ही ‘सेल्फी’ नाटकासाठी जेव्हा जातो तेव्हा स्वतः चा कचऱ्याचा डबा घेऊन जातो. कारण तेथे कचऱ्याचा डबा नसतोच. त्यामुळे स्वच्छता राखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे, असे मला वाटते.
 
मोबाईल जॅमर बसवले गेले पाहिजेत – प्रसाद ओक, दिग्दर्शक / अभिनेता
डोंबीवली, कल्याण येथील नाट्यगृहाची अवस्था खरोखरच खूप वाईट आहेत. सर्वात घाणेरडापणा वाटतो तो म्हणजे स्वछतागृह. जी कधीच स्वच्छ नसतात. प्रयोगाआधी फ्रेश व्हायचे असेल तर तो इतका किळसवाणा प्रकार असतो. नकोच वाटतं सगळं. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रेक्षकांना आपली जबाबदारी समजली पाहिजे. प्रयोग सुरु असताना मोबाईलची रिंग वाजणं, काही लोकं तर अक्षरशः फोन उचलून मोठमोठ्याने बोलत राहतात. त्यात काही वेळेला लहान मुलं आरडा-ओरड, अगदीच लहान बाळ रडत राहणं सुरूच असतं. अशा वातावरणात मनावर ताबा ठेवून प्रयोग करावा लागतो. यासाठी नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसवले गेले पाहिजेत. किंवा मॉलमध्ये जशी लॉकरची सोया असते त्याप्रमाणे मोबाईल बाहेरच ठेवून प्रेक्षागृहात प्रवेश दिला गेला पाहिजे. ज्या नाटकांसाठी १२ वर्षाखालील मुलांना प्रवेश निषिद्ध असेल तर बाहेर एन्ट्रीच्या वेळीच अशा मुलांना आणि पालकांना एंट्री नाही दिली पाहिजे. असे काही तोडगे काढले गेले पाहिजेत.
 
प्रत्येक नाट्यगृहाने १०० टक्के स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा – विभव राजाध्यक्ष, अभिनेता
नाट्यगृहात गेल्यानंतर प्रत्येकालाच लागणारी बेसिक गोष्ट म्हणजे स्वच्छतागृह. तीच अनेक ठिकाणी वाईट अवस्थेत आहेत. त्या वासात एक तास घालवणे फार कठीण होऊन जाते. त्यामुळे प्रसाधनगृह सुधारणं अत्यन्त गरजेचे आहे. कलाकारासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आरसा. आणि अनेक ठिकाणी हा आरसाच खराब, तुटलेल्या आणि भुरकट झालेल्या अवस्थेत असतो. त्यामुळे या सध्या सध्या पण महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी नाट्यगृहांनी घेतलीच पाहिजे. प्रत्येक नट जर प्रत्येक प्रयोगाला आपले १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतो तर मग प्रत्येक नाट्यगृह १०० टक्के स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करूच शकतं.
सुरूवातीला दिमाखात सुरु होतात, नंतर दुर्लक्ष होते – सिद्धार्थ जाधव, अभिनेता
महाराष्ट्रातील नाट्यगृहांची अत्यन्त वाईट झाली आहे. औरंगाबाद येथील नाट्यगृहात तर स्टेजवर खिळे बाहेर आलेले आहेत. अनेकदा प्रयोगावेळी ते लागतात आणि जखम होते. तरीही प्रयोग सुरूच ठेवावा लागतो. डोंबविली आणि कल्याण येथील नाट्यगृह जेव्हा सुरु झाले तेव्हा त्याचा दिमाखदार सोहळा केला. मात्र नंतर त्याची काळजी घेण्याकडे प्रशासन आणि नाट्यगृह मालकांचे दुर्लक्ष होते. महाराष्ट्रातील तमाम रंगकर्मींसाठी हि दुर्दैवाची बाब आहे.

स्वच्छतागृह नावाची गोष्टच स्वच्छ नसते – जितेंद्र जोशी, अभिनेता
स्वच्छ्ता ही पहिली बेसिक गरज आहे. ज्या वास्तुमधे जावंसंच वाटत नाही तिथे परफॉर्म करायची इच्छा होणार नाही आणि प्रेक्षक तरी का येतील? वास्तु किती अवाढव्य पेक्षा कलाकार आणि प्रेक्षक यांच्यासाठी किती सोईची हे महत्त्वाचं आहे. स्वच्छतागृह नावाची गोष्टच स्वच्छ नसते. बाकी सोडूनच देऊया.

नाट्यगृहांना काळानुरूप बदलण्याची गरज आहे – प्रसाद कांबळी, अध्यक्ष, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ
नाट्यगृहांच्या बाबतीत असलेल्या या समस्या फार वर्षांपासूनच आहे. आता सर्व नाट्यगृहांची इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याकडे वाव देणार आहोत. निर्माता संघ आणि नाट्यगृह मालक यांची मिटिंग घेऊन एक समिती नेमणार आहोत.यामध्ये नेपथ्य, लाईट्स, तंत्रज्ञ, कळकरांमधील प्रतिनिधी असतील. जेणेकरून केवळ कलाकारच नाही, तंत्रज्ञ आणि पडद्यामागील कलाकारांच्या सोयीविषयी विचार करण्यात येईल. खासगी किंवा पालिकेच्या सर्वच नाट्यगृहांमध्ये चार्जर, वायफाय अशा टेक्नॉलॉजिची सोयही करण्यात येईल. रात्री उशिरा प्रयोग संपल्यानंतर कलाकार आपापल्या वाहनांनी घरी जाऊ शकतात, मात्र बॅकस्टेज आर्टिस्ट यांना ट्रेन किंवा बसने प्रवास करावा लागतो. काही वेळेला रात्र बाहेरच काढावी लागते. यासाठीच त्यांना आरामासाठी खोल्यांची सोय करता येईल का ? हाही विचार करण्यात येणार आहे. निर्माता संघाच्या वतीने अधिकाधिक ई-टॉयलेट, लिफ्ट यांचाही विचार करण्यात येईल. नाटक पाहायला येणाऱ्यांमध्ये ४०टक्के ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यासाठी वेगळा प्रवेश, लिफ्ट यांची सोया केली जाईल. नाट्यगृहांना काळानुरूप बदलण्याची गरज आहे. यासाठी निर्माता संघ नक्कीच प्रयत्न करेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button