Marathi News
नाजुका आणि रायबा उधळणार ‘प्रीती सुमने’
प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवणारा ‘अगडबम’ सिनेमा आठ वर्षांपूर्वी भेटीस आला होता. या चित्रपटातील नाजुकाने प्रत्येक सिनेरसिकाचे मन जिंकलं होतं. त्यामुळे ही नाजुका पुन्हा एकदा ‘माझा अगडबम’ द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमातील विनोदाचा उच्चांक गाठणारे ‘अटकमटक’ ‘गाणे सध्या प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत असतानाच, आणखीन एक ‘प्रीती सुमनें’ हे लव्ह सॉंग सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. सुबोध भावे आणि तृप्ती भोईर यांच्यावर चित्रित केलेलं ‘प्रीती सुमनें’ हे गाणं नाजूका आणि तिचा पती रायबाच्या आगळ्यावेगळ्या प्रेमावर आधारित आहे.
‘पेन इंडिया लिमिटेड कंपनी’चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम’ हा सिनेमा ‘नाजूका’ या प्रमुख पात्रावर आधारित आहे. सर्वसामान्य प्रेमीयुगूलांपेक्षा अगदी हटके असणाऱ्या या जोडीची प्रेमछटा दाखवणारे ‘प्रीती सुमने’ हे गाणं मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले आहे. तसेच, टी. सतीश चक्रवर्ती यांनी या गाण्याला संगीत दिले असून, हिंदीची सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालसह त्यांनी हे गाणे गायलेदेखील आहे.
येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला ‘माझा अगडबम’ हा सिनेमा मनोरंजनाची खुमासदार मेजवानी प्रेक्षकांना घेऊन येत आहे. सुपरहिट ‘अगडबम’ चा दमदार सिक्वेल असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन तृप्ती भोईरनेच केले असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीफळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. शिवाय, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.
Watch video :