Marathi News
दुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘फुगडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
झी मराठी वरील “लगीर झालं जी “या लोकप्रिय मालिकेचे पार्श्वगीत, “ये रे ये रे पावसा” चित्रपटाचे टायटल साँग, लव्ह लफडे चित्रपटातील ‘ताईच्या लग्नाला’ यासारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांचे अजून एक नवे चित्रपट गीत लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. पण या चित्रपटाचे नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि निलेश पाटील ( शेलिनो ड्रीम्स इन्फोटेन्मेंट ) निर्मित “फुगडी” या गायक प्रवीण कुवर यांच्या आवाजातील गाण्याचे रेकॉर्डींग नुकतेच युफोनी स्टुडिओ, अंधेरी पश्चिम येथे पार पडले. निलेश पाटील यांची ही पहिलीच निर्मिती असून लवकरच या गाण्याच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे.
“फुगडी…” या गाण्याची रचना हि नवोदित गीतकार रमझान पठाण यांची असून दिग्दर्शन सुकेश सावर्डेकर यांनी केलं आहे. या गाण्यावर अभिनेता चेतन कुमावत थिरकणार असून चेतनने याआधी बरीच व्यावसायिक नाटकं, लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपट, तसेच कलर्स मराठी वरील कुंकू टिकली टॅटू या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील त्याने साकारलेला खलनायक विशेष गाजला. त्यामुळे आता या गाण्यात तो काय धम्माल करणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
दुर्वा एंटरटेन्मेंट प्रस्तुत फुगडी हे एक मराठी सोबतच हिंदी टच असलेलं भन्नाट गाणं लवकरच चेतन कुमावतच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हिंदी टच व्यतिरिक्त इतर अनेक गमती जमती या गाण्यात पाहायला मिळणार आहेत. सुकेश सवर्डेकर यांनी याआधी मराठी चित्रपट विठ्ठला शप्पथची निर्मित केला आहे. आज पार पडलेल्या या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी गायक प्रवीण कुवर यांच्यासह दिग्दर्शक सुकेश सावर्डेकर आदी उपस्थित होते.