कादंबरीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’; प्रसाद ओकचे दिग्दर्शन, अक्षय बर्दापूरकरची निर्मिती आणि अजय-अतुलचं संगीत
मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आणि आता ‘चंद्रमुखी’ नाव पुन्हा पाहिलं जाणार मोठ्या पडद्याच्या माध्यमातून…
नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एका नवीन सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि त्या सिनेमाचे नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या रुपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या मराठी सिनेमाचे टीझर पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले आहे.
या सिनेमाची निर्मिती प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे ‘AB आणि CD’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या दोन सिनेमांच्या निर्मितीनंतर ‘चंद्रमुखी’ हा त्यांचा तिसरा सिनेमा आहे. अक्षय यांच्या पहिल्या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे तर दुस-या सिनेमात सायली संजीवच्या भूमिकेतून पैठणीसाडी भोवती एक सुंदर गोष्ट मांडली आहे आणि आता कादंबरीवर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत.
विश्वास पाटील लिखित ‘चंद्रमुखी’ ही राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड घालणारी कादंबरी आहे. तमाशात लावणी सादर करणारी नृत्यांगना, सौंदर्यवती अशा भूमिकेला अगदी सहजपणे शोभून दिसणारी आणि ‘चंद्रमुखी’च्या पात्राला अचूक न्याय देणारी अभिनेत्री कोण असेल याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.
प्रसिध्द लेखकाच्या प्रसिध्द लेखणीवर जेव्हा सिनेमा तयार केला जातो तेव्हा त्या सिनेमाचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखन कोण करणार हा सहजपणे मनात येणारा प्रश्न असतो. कारण कादंबरीत जे मांडलंय ते पडद्यावर तितक्याच ताकदीने मांडलं गेलं पाहिजे ही एक अपेक्षा आणि इच्छा असते. आणि या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांभाळली आहे. लेखकाचं मनोगत पडद्यावर मांडण्याचं प्रसाद ओक यांचं कौशल्य अनेकांनी त्यांच्या ‘हिरकणी’ या सिनेमात अनुभवलं आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमाचे पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेले आहे. ‘हिरकणी’ची लेखक-दिग्दर्शक जोडी ‘चंद्रमुखी’साठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.