Marathi News

आपल्या वाढदिवशी करण देणार मराठी प्रेक्षकांना भेट – धर्मा प्रोडक्शन्सची बकेट लिस्टसोबत मराठीत धमाकेदार एंट्री

BUCKET LIST Marathi Movie Poster
BUCKET LIST Marathi Movie Poster

हिंदी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक दमदार, दर्जेदार चित्रपट निर्मित करणारे धर्मा प्रॉडक्शन्स आता मराठी चित्रपट निर्मितीत उतरत आहे.  हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अधिराज्य गाजवणारी धकधक गर्ल माधुरी दिक्षित यांच्यासोबत ‘बकेट लिस्ट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीला धर्मा प्रॉडक्शन्स व ए.ए.फिल्म्स प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत सादर करीत आहेत. हा चित्रपट २५ मे २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात माधुरीसोबत सुमित राघवन, रेणुका शहाणे, दिलीप प्रभावळकर, शुभा खोटे, वंदना गुप्ते, इला भाटे, प्रदीप वेलणकर, मिलिंद पाठक आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

तेजस प्रभा विजय देऊस्कर हा चित्रपट दिग्दर्शित करणार असून डार्क हॉर्स सिनेमाज् प्रा. लि. चे जमाश्प बापुना व अमित पारिख, दार मोशन पिक्चर्स चे अरूण रंगाचारी व विवेक रंगाचारी तसेच ब्लु मस्टँग क्रिएशन्स प्रा. लि. चे आरती सुभेदार व अशोक सुभेदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बकेट लिस्ट या चित्रपटाची कथा आयुष्यात अपुरी स्वप्ने घेऊन जगणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाची आणि कुटुंबाची कथा आहे. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा चित्रपट साऱ्यांनाच प्रेरित करेल असा आहे.

या चित्रपटाविषयी माहिती देताना धर्मा प्रॉडक्शन्सचे सर्वेसर्वा करण जोहर म्हणाले की प्रादेशिक सिनेमांमध्ये केली जाणारी संहितेची उत्तम हाताळणी भाषेचे सगळे निर्बंध फोल ठरवते, यावर माझा विश्वास होता. बाहुबली चित्रपटाला मिळालेल्या यशाने माझा हा विश्वास अधिक दृढ झाला. त्यात माधुरीसारख्या सुपरस्टारला तिच्याच मातृभाषेत लाँच करण्याची जी संधी मला मिळाली त्याबद्दल आनंदच आहे. ए. ए. फिल्म्स यांच्या साथीने मराठी सिनेसृष्टीत धर्मा प्रोडक्शन्सचं पडलेलं हे पहिलं पाऊल, बकेट लिस्ट या चित्रपटाला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देतील याबाबत मला खात्री आहे, असा विश्वास करण जोहरने व्यक्त केला.

या चित्रपटाविषयी बोलताना माधुरी म्हणाली की ‘बकेट लिस्ट’ हा चित्रपट माझी अनेक वर्षांपासूनची मराठी चित्रपट करण्याची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करतो. मराठी चित्रपट आशय संपन्न असतात आणि म्हणूनच जगभरातील चोखंदळ प्रेक्षकांच्या पसंतीला ते उतरतात. बकेट लिस्टच्या माध्यमातून एका उत्तम संहितेचा आणि चांगल्या कलाकृतीचा भाग होता आले, याचा मला आनंद आहे. माझ्या वाढदिवसाच्या महिन्यातच हा चित्रपट सादर करण्याची घोषणा करून करण जोहरने मला अतिशय सुंदर भेट दिली आहे. माझ्या चाहत्यांइतकीच मी या सिनेमाबाबत उत्सुक आहे. मराठी प्रेक्षकांसोबतच माझ्यासाठीही हा एक सुंदर अनुभव असणार आहे, असे मनोगत माधुरीने व्यक्त केले.

तसेच, माधुरी लवकरंच करण जोहर निर्मित अभिषेक वर्मन दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. यापूर्वी अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘यह जवानी हैं दिवानी’ (२०१३) मध्ये ‘घागरा’ या गाण्यात माधुरी रणबीर कपूर सोबत झळकली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button