Marathi News

‘अशा’ भूमिका समृद्ध करतात – तेजश्री प्रधान

Tejashree Pradhan
Tejashree Pradhan

लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ ह्या चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. एका वेगळ्या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटातून तेजश्री प्रधान आपल्याला आता पर्यंत कधीही न दिसलेल्या अशा निराळ्याच भूमिकेत दिसणार आहे. तेजश्री या सिनेमात एका वकिलाची भूमिका साकारत आहे. तिच्या भूमिकेचे नाव आहे ऋतुजा.

ऋतुजा ही अतिशय आत्मविश्वास असणारी, धाडसी आणि तितकीच भावनिक अशी वकील आहे. एक उद्देश समोर ठेऊन ती वकील होण्याचे ठरवते. भूतकाळात घडलेल्या घटनेमुळे ती आपल्या वडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्या विरोधात खटला चालवते. न्याय मिळवून देण्यासाठी एका मुलीने आपल्या जन्मदात्या पित्याविरोधातच पुकारलेल्या बंडाचे चित्रण या चित्रपटात केले आहे.

पहिल्यांदाच वकिलाच्या भूमिका साकारताना नक्की काय भावना होत्या असे विचारल्यावर तेजश्री सांगते, ” एक अभिनेत्री म्हणून मला अभिनयाच्या सर्वच छटा साकारायची इच्छा आहे. त्यामुळे असे वेगळे रोल मला करायला खूप आवडतात. अशाच भूमिका मला एक कलाकार म्हणून समृद्ध करण्यास मदत करतात. ही भूमिका जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी कायद्याचा थोडा अभ्यास केला. वकिलांची देहबोली त्यांचे व्यक्तिमत्व याचे मी निरीक्षण केले. वकील असली तरी माझ्या भूमिकेला एक भावनिक किनार देखील आहे. एकाच व्यक्तीच्या स्वभावाचे दोन वेगळे पैलू प्रेक्षकांना दिसणार आहे. दिग्दर्शक समीर सुर्वे आणि मंगेश देसाई यांनी मला ही भूमिका साकारताना खूप मदत केली.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button