Marathi NewsMarathi TrendsNews

लँडमार्क फिल्म्सचे तीन चित्रपट राज्य पुरस्कारांच्या यादीत

मराठी सिनेसृष्टीला ‘वजनदार’, ‘रिंगण’ आणि ‘गच्ची’ यांसारखे दर्जेदार तसेच आशययुक्त सिनेमा प्रदान करणाऱ्या विधी कासलीवाल यांच्या लँडमार्क फिल्म्सला यंदाच्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमुळे वलय प्राप्त झाले आहे. कारण, लँडमार्क फिल्म्सची प्रस्तुती आणि निर्मिती असलेल्या ‘रेडू’, ‘नशीबवान’ आणि ‘पिप्सी’ या आगामी सिनेमांची दखल येत्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात घेण्यात आली आहे.

५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनाची शिफारस तसेच ७ तांत्रिक पुरस्कार आणि बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी निवड झालेल्या अंतिम १० चित्रपटांच्या यादीत लँडमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘रेडू’ आणि ‘नशीबवान’ या सिनेमांचा समावेश आहे. सागर वंजारी दिग्दर्शित ‘रेडू’ या सिनेमातील श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषेचा पुरस्कार जाहीर झाला. तर सर्वोत्कृष्ट कथा आणि पटकथेसाठी संजय नवगिरे, सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी गुरु ठाकूर, सर्वोत्कृष्ट संगीत आणि पार्श्वसंगीतासाठी विजय गवंडे, सर्वोत्कृष्ट गायकासाठी अजय गोगावले आणि सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी शशांक शेंडे आणि छाया कदम यांना, असे एकूण १० नामांकन मिळाले आहेत.
शिवाय अमोल वसंत गोळे दिग्दर्शित ‘नशीबवान’ या सिनेमातील सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी नंदकुमार घाणेकर, सर्वोत्कृष्ट गायिकेसाठी शाल्मली खोलगडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता भालचंद्र कदम, सहाय्यक अभिनेत्यासाठी अतुल आगलावे आणि सहाय्यक अभिनेत्रीसाठी नेहा जोशीला असे एकूण सहा नामांकन प्राप्त झाली आहेत.  तसेच प्रथम प्रदार्पण दिग्दर्शनासाठी ‘पिप्सी’चे दिग्दर्शक रोहन देशपांडे यांना नामांकन मिळाले असून, या सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मैथिली पटवर्धनला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. ‘पिप्सी’ लँडमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि निर्मित यावर्षी प्रदर्शित होत असलेले हे सिनेमे, सिनेप्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपटांची नांदी घेऊन येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button