Marathi NewsNews
अनानच्या निमित्ताने ओंकार-प्रार्थनाचा नृत्याविष्कार!


सध्या एकापेक्षा एक अशा सूर मधुर गाण्यांमुळे सर्वत्र चर्चेचा विषय असलेल्या ‘अनान’ या आगामी मराठी चित्रपटातील भगवान शंकरांच्या द्विभुज स्वरुपाचे दर्शन घडवणारे ‘तांडव’ नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. ‘गंधी सुगंधी’ आणि ‘एक सूर्य तू’ या दोन्ही हिट गाण्यांनंतर आता ओंकार शिंदे आणि प्रार्थना बेहेरे या नवीन दमदार जोडीचा नृत्याविष्कार आपल्याला या तांडव द्वारे पाहायला मिळणार आहे.
शिव रुद्र आणि शिव नटराज असे तांडवाचे दोन प्रकार म्हणजेच भगवान शिव शंकरांचे रौद्ररूपाचे प्रतीक असलेले शिव रुद्र तांडव आणि त्यांच्या आनंदी क्षणातील सौम्य रूपाचे प्रतीक असलेले शिव नटराज तांडव आपल्याला अनानच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत. तोडीस तोड असलेले ओंकार शिंदे आणि प्रार्थना बेहेरे यांच्या उत्कृष्ट अशा सदाबहार नृत्याचा आस्वाद आपल्याला ह्याद्वारे घेता येणार आहे.
‘अनान’ चित्रपटातील इतर सर्व गाण्यांप्रमाणेच ‘तांडव’ देखील दिग्दर्शक राजेश कुष्टे यांच्या लेखणीतून अवतरलेले असून सौरभ–दुर्गेश ह्या संगीतकार जोडीने ते संगीतबद्ध केलेले आहे. तर स्वराधीपती रवींद्र साठे यांच्या मधुर स्वरांनी त्याला साद घातली गेलेली आहे.
‘रोहन थिएटर्स’ चे रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया यांनी ‘अनान’ या चित्रपटाची निर्मिती केलेली असून कथा आणि क्रिएटीव्ह डिरेक्शन हेमंत भाटिया यांचं आहे. दिग्दर्शन राजेश कुष्टे यांनी केलेलं आहे तर पटकथा–संवाद राजेश कुष्टे आणि मुकेश जाधव यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचं संकलन सेजल पेंटर यांनी केलं असून छायाचित्रण राज कडूर यांनी केलं आहे.
लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील रवींद्र साठे यांच्या मधुर स्वरांनी सजलेल्या या स्वरमधुर मैफिलीचा आस्वाद तुम्हीही नक्की घ्या.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.