LALBAUGCHI RANI Live Music Concert- बोनी कपूर यांच्या उपस्थितीत रंगला ‘लालबागची राणी’चा लाइव्ह म्युझिकल कॉनसर्ट
बॉलीवूडचा प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि ‘टपाल’ चे दिग्दर्शक म्हणून नावाजलेले लक्ष्मण उतेकर एका सामाजिक विषयावर भाष्य करणारा ‘लालबागची राणी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. मुंबईकरांचे प्रातिनिधिक ठिकाण असलेल्या ‘लालबाग’ला केंद्रस्थानी ठेवून ‘लालबागची राणी’ या त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे धमाकेदार ‘लाइव्ह म्युझिक कॉनसर्ट’ चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत ‘लालबाग’मध्ये पार पडला. ‘लालबागच्या राजा’ला मानवंदना देण्यासाठी या हटके कार्यक्रमाचे चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांच्या उपस्थितीत भव्य आयोजन करण्यात आले होते. लालबाग येथील नागरिकांसाठी विशेष आयोजित या भव्य कार्यक्रमात चित्रपटांच्या गाण्यांची प्रत्यक्ष मजा अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनीही तुडुंब गर्दी केली होती.
लालबागच्या गरमखाडा मैदानात रंगलेल्या या कार्यक्रमात लालबागवासियांचे ‘लालबागची राणी’च्या टीमने फुगे देत स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेले बोनी कपूर यांनी मराठीत बोलून प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढवला. तसेच लक्षमण उतेकरांचे कौतुक करत लालबागची राणी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर नवीन विषय घेऊन येत असल्याचे सांगितले. तसेच, ‘बोनी कपूर यांनी ‘लालबागची राणी’ या चित्रपटाची कथा न ऐकता विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे’ असे उतेकर यांनी सांगितले. लालबागची राणी या चित्रपटातील कलाकरांचे देखील त्यांनी कौतुक केले.
हिंदीतील सुप्रसिध्द गायक दिव्य कुमार यांच्या सुरेल आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. चित्रपटामधील त्यांच्या आवाजातील ‘लाडाची मुंबई’ या ‘मुंबई अॅनथम’ गाण्याला वन्स मोअर देखील मिळाला. वैशाली भैसने माडे आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या ‘रूप तेरा’ या गाण्यावर सर्वांना ठेका धरायला लावला. तर कीर्ती संगठीया यांच्या हृद्यस्पर्शी ‘मला रंग मिळाले’ या गाण्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच ‘आली आली लालबागची राणी’ हे आदर्श शिंदेच्या भारदस्त आवाजातील गाण्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्यांच्या प्रतिसादाने मैदान दुमदुमून गेले. या गाण्यावर लालबागकरांसोबत सिनेमाचे कलाकार देखील नाचले. रोहित नागभिडे यांच्या बहारदार संगीत शैलीने प्रत्येक गाण्याची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे कौतुक केले गेले.
वीणा जामकरसह चित्रपटातील इतर कलाकार प्रथमेश परब, अशोक शिंदे, पार्थ भालेराव, नेहा जोशी, जयवंत वाडकर, प्रतिमा जोशी, सुयश जोशी, रेश्मा नाईक यांनीही प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण केले. हिंदीतील अनेक गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या ‘मॅड एंटरटेनमेंट’ या बॅनरखाली सुनील मनचंदा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हिंदीतील ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘ब्लू’, ‘लेकर हम दिवाना दिल’, ‘बॉस’, ‘ डॉन २’ यांसारख्या हिट सिनेमांचे सिनेमॅटोग्राफर लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शनासोबतच सिनेमाच्या सहनिर्मितीतही भाग घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या या दुहेरी जबाबदारीने चित्रपटाला आत्मीयतेचा अनोखा स्पर्श झाला आहे. ‘लालबागची राणी’ हा कौटुंबिक मनोरंजक सिनेमा ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे.