दिप्ती सती ठरली पहिली ‘लकी’ गर्ल, दिप्तीला मिळालं पहिलं मराठी ‘हिरोइन- इंट्रोडक्शन’ साँग
बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नवी हिरोइन लाँच होताना, तिच्यासाठी फिल्ममेकर्सनी खास ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँग बनवण्याची परंपरा नवी नाही. मात्र मराठी सिनेसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीने पहिलं पाऊल ठेवताना तिच्यासाठी खास इंट्रोडक्शन साँग बनणे, हे कधी झाले नाही. पण संजय जाधव हे नेहमी आपल्या सिनेमांमधून काहीतरी हटके करण्यासाठी प्रचलित आहेत. त्यामूळेच त्यांनी आपल्या ‘नव्या’ हिरोइनसाठी खास हिरोइन-इंट्रोडक्शन साँग केले आहे.
7 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र झळकलेल्या लकी सिनेमातली हिरोइन दिप्ती सतीचे हे ‘जी ले जरा’ गाणे नुकतेच सोशल मीडियावरून लाँच झाले आहे. यो (सचिन पाठक) ने लिहीलेल्या गीताला पंकज पडघन ह्यांनी संगीत दिले आहे. आणि शाल्मली खोलगडेने हे गाणे गायले आहे.
ह्या गाण्याविषयी फिल्ममेकर संजय जाधव म्हणतात, “बॉलीवूड आणि तमिळ सिनेमांमध्ये हिरोइनला लाँच करताना, तिचे पहिले गाणे खूप स्पेशल असावे, ह्यावर भर दिला गेलेला मी पाहिलाय. पण मराठीत असे साँग मी पाहिले नव्हते. फिल्ममध्ये लावणीने हिरोइनची एन्ट्री झालेली आहे. पण तिचा पहिला-वहिला सिनेमा असताना तिचे खास इंट्रोडक्शन करण्यासाठी कधी साँग बनवले गेले नव्हते. माझ्या हिरोइनचीही कधी अशी एन्ट्री व्हावी असं मला नेहमी वाटायचं. दिप्ती उत्तम डान्सर आहे. ती कथ्थक आणि भरतनाट्यममध्ये विशारद आहे. तर हिपहॉप आणि फ्री स्टाइल डान्सिंगही तिला खूप चांगली जमते. त्यामूळे मी माझी खूप वर्षांपासूनची ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँगची इच्छा ‘जी ले जरा’ गाण्याने पूर्ण केली.”
‘जी ले जरा’ गाणे कालाघोडा, मुंबई सीएसटी स्टेशन, चर्चगेट स्टेशन, मुंबई युनिव्हर्सिटी, सोफिया कॉलेज अशा भागांमध्ये चित्रीत झालंय. दिप्ती सतीसोबत ह्या गाण्यामध्ये सूमारे 50 डान्सर्स सहभागी झाले आहेत. ह्याविषयी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणतात, “मुंबईतल्या सर्वात जास्त वर्दळ असलेल्या भागात आम्ही हे गाणे चित्रीत करत होतो. हे गाणे जरी आम्ही रविवारी चित्रीत केले असले तरी, ह्या ठिकाणी रविवारी येणा-या पर्यटकांची संख्या जास्त असते. जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांच्या जमावासमोर न विचलीत होता दिप्ती सतीने ह्या गाण्याचे चित्रीकरणे केले. त्यामूळे मला तिचे कौतुक वाटते. ”
दिप्ती सती म्हणते, “ कोणत्याही अभिनेत्रीसाठी सिनेसृष्टीत असे लाँच मिळणे, हे स्वप्नवत आहे. त्यामूळे मी संजयदादांची खूप ऋणी आहे, की त्यांनी मला एवढ्या धमाकेदार एनर्जेटिक गाण्याने सिनेसृष्टीत लाँच केले.”
ह्या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी विचारल्यावर दिप्ती म्हणते, “गाण्याचे चित्रीकरण एका दिवसात पूर्ण केले. ह्या गाण्यात माझे बरेच चेंजेसही आहेत. त्यात गाण्याचे कोरीओग्राफर उमेश जाधव होते. त्यांच्या एनर्जीला मॅच करत, डान्स-स्टेप आत्मसात करत, भर-भर कपडे चेंज करत, गाण्याचे चित्रीकरण पूर्ण करणे चॅलेंजिंग होते. पण मला आम्ही ते गाणे वेळेत पूर्ण केले. आणि ते खूप छान आकाराला आलंय, याचे मला खूप समाधान आहे.”
‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकला आहे.