Marathi TrendsMoviesUpcoming Movies 2024

कोकण पर्यटनास प्रोत्साहन देतोय ‘देवा’

मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘देवा’ या सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. प्रसिद्धीसाठी वापरल्या जाणा-या हटके कल्पनांमुळे लोकांच्या पसंतीस पडत असून, हा सिनेमा कोकण पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे सर्वाधिक चित्रीकरण हे कोकणातले आहे. या सिनेमाच्या ट्रेलर, टीझर तसेच गाण्यांमधूनसुद्धा कोकणपट्ट्यातील निसर्गसौदर्य दिसून येत असल्यामुळे, महाराष्ट्राच्या कुशीत वसलेल्या कोकणची सफरच जणू या सिनेमाद्वारे आपणास करता येणार आहे.

मुरली नलप्पा दिग्दर्शित, ‘देवा’ या सिनेमाचे कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, नेरूळगाव, अंबाघाट, वालवा आणि चिपी मालवण ब्रिज अश्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले असून, या ठिकाणांबरोबरच, कोकणी लोककला, भाषा- संस्कृती तसेच खाद्यपदार्थांचा देखील आस्वाद या सिनेमाद्वारे घेता येणार आहे. विशेष म्हणजे, या सिनेमातून बालाडान्स, दशावतार आणि नमन या लोककलादेखील लोकांसमोर सादर केले जाणार आहेत. त्यामुळे कोकणाची इत्यंभूत माहिती संक्षिप्त रुपात ‘देवा’ सिनेमाद्वारे कोकणप्रेमींना मिळवता येऊ शकेल. या सिनेमाविषयी बोलताना निर्माते प्रतिक चक्रवर्ती सांगतात कि, ‘आपण देश-विदेशात जाऊन सिनेमाचे चित्रीकरण करतो. मुळात आपल्या महाराष्ट्रातच निसर्ग सौंदर्याने नटलेले अनेक ठिकाण आहेत. जी विदेशातील निसर्ग सौंदर्याशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे एकदा तरी कोकणात येऊन बघा, चित्रीकरणासाठी चांगले दृश्य येथे लाभतील’.

लोकांच्या आयुष्यात सुखाचे रंग भरण्यास येत असलेल्या ‘देवा’ चा हा अतरंगीपणा तमाम कोकणप्रेमींसाठी एक सुखद धक्का असून, या सिनेमाच्या निमित्ताने कोकणी पर्यटनाला अधिक चालना मिळाली तर नवल वाटायची काहीच गरज नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button