Marathi News

बाबा मला मिळालेली अमूल्य देण आहे – ललित प्रभाकर

ललित प्रभाकर
ललित प्रभाकर

माझ्या आयुष्यात बाबांचं स्थान खूप महत्वाचं आहे. बाबा माझे आदर्श आहेत. एका छोट्या खेडेगावातून शिक्षण घेऊन बाबा रिकाम्या खिशाने मुंबईत काम करण्यासाठी आले होते. अनेक रात्री त्यांनी रेल्वे स्टेशनवर जागून काढल्या. त्यानंतर त्यांना नोकरी मिळाली आयुष्यात स्थिरता यायला लागली. त्यावेळी त्यांनाही माझ्या आईला शिकवून नोकरीस लावले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत माझे बाबा पुढे आले आहे. त्यामुळे त्यांना सर्वच गोष्टींची जाणीव आहे. ते नेहमीच मला कधीही यशाने हुरळून न जाता पाय जमिनीवर राहू देत जा असे सांगत असतात. मुख्य म्हणजे हे तत्व ते स्वतः आचरणात आणतात. बाबा मला देवाकडून मिळालेली एक अमूल्य देण आहे.
माझ्या बाबांनी माझ्या सर्व गरजा अगदी मी न सांगता पूर्ण केल्या आहेत. काहीवेळा मी ओरडा पण खाल्ला आहे. पण त्यामागे त्यांचा हेतू नेहमी योग्य असायचा. बाबांनी मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला. पण अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या माझ्या निर्णयाला त्यांचा पाहिजे तसा पाठिंबा नव्हता. त्याचे कारणही तसेच होते. हे क्षेत्र खूप अस्थिर, अनिश्चित आहे. यात माझा टिकाव कसा लागेल याची काळजी त्यांना नेहमी असायची. आता मात्र माझा काम पाहून त्यांना माझा अभिमान वाटतो. मला घडवण्यात माझ्या बाबांचा अगदी सिंहाचा वाटा आहे.

मी त्यांचे कष्ट त्यांचे काम खूप जवळून पहिले आहे. अगदी कठीण काळातही बाबांनी हार न मानता मेहनत केली. एवढा सर्व काम करत असतांना सुद्धा त्यांच्या सोबत एक गोष्ट नेहमीच राहिली आणि म्हणजे त्यांचे हास्य. बाबांवर कितीही अवघड वेळ आली असली तरी ते नेहमी हसत असतात. हसून आलेल्या संकटाचा सामना ते करतात. त्यामुळे त्यांना कधीही  ‘स्माईल प्लीज’ असे सांगावे लागले नाही. याउलट तेच सर्वाना  ‘स्माईल प्लीज’ असा गोड सल्ला देत असतात.  बाबांनी आता छान आराम करून त्यांचे सर्व छंद पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी आमची इच्छा आहे. सर्वाना ‘फादर्स डे’ च्या हार्दिक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button