Marathi News

Saavat Marathi Movie: महिला दिनाच्या आठवड्यात रिलीज झाला तीन स्त्री निर्मातींच्या सुपरनॅचरल थ्रिलर ‘सावट’चा ट्रेलर

Saavat Teaser Poster

हितेशा देशपांडे, स्मिता तांबे, आणि शोभिता मांगलिक ह्या तीन महिला निर्माती ‘महिला सशक्तीकरणा’वर भाष्य करणारा सुपरनॅचरल थ्रिलर ‘सावट’ सिनेमा लवकरच घेऊन येतायत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आठवड्याचं औचित्य साधून ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आलाय.

ह्याविषयी सिनेमाचे दिग्दर्शक सौरभ सिन्हा म्हणतात, “सावट हा चित्रपट सुपरनॅचरल थ्रिलर आहे. ब-याचदा अशा धाटणीच्या चित्रपटात भुताटकी, हडळ, चेटकीणचं लोकांना घाबरवते. नेहमी कथांमध्ये ‘वाईट शक्ती’म्हटलं की स्त्री रूपचं असतं असं आपण अनादी काळापासून कल्पनेत पाहतो. बाईला देवी म्हणून पूजणारे आपण क्षणात तिला हडळ म्हणून वाळीतही टाकतो. ह्यावरच सिनेमा भाष्य करतो. त्यामूळे स्त्रीशक्तिला समर्पित करणा-या आठवड्यात सिनेमाचा ट्रेलर आम्ही लाँच केला. त्यातच योगायोगाने सिनेमाच्या तीनही निर्मात्या स्त्रीयाच असल्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दूस-या दिवशी हा ट्रेलर लाँच करून स्त्रीयांविषयीचा नवा दृष्टिकोण देणा-या नव्या पर्वाची सुरूवात करावी, असं आम्हांला वाटलं.”

सुपरनॅचरल थ्रिलर धाटणीच्या ह्या सिनेमाचा ट्रेलर सिनेमाविषयीची उत्कंठा वाढवणारा आहे. सिनेमाची निर्माती आणि अभिनेत्री स्मिता तांबे म्हणते, “सावट सिनेमात मी कणखर पोलिस अधिकारी आदिती देशमुखच्या भूमिकेत दिसणार आहे. हुशार, संवेदनशील आणि करारी व्यक्तिमत्वाची आदिती ‘सत्या’चा शोध घेताना येणा-या प्रत्येक अडथळ्याला कणखरपणे दोन हात देते. पोलिस आहेत म्हणून आपल्या सहका-यांना साथ द्यायची आणि गुन्हेगार आहेत म्हणून त्यांच्या बोलण्यावर अविश्वास दाखवायचा, अशी ती वागत नाही. तिच्यावर कोणी आपला प्रभाव टाकून तिची मतं बदलवू शकत नाही. अशापध्दतीने स्वत:ची लढाई खंबीरपणे लढणा-या स्त्रियांविषयी मला जास्त आदर आहे. महिला दिनीच्याच आठवड्यात लाँच झालेला हा ट्रेलर रसिकांना आवडेल, अशी आम्हांला अपेक्षा आहे. “

‘निरक्ष फिल्म्स’च्या सहयोगाने ‘लेटरल वर्क्स प्रा.लि.’ आणि ‘रिंगीग रेन फिल्म्स’च्या सावट चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ सिन्हा ह्यांनी केले आहे. हितेशा देशपांडे,स्मिता तांबे, आणि शोभिता मांगलिक ह्यांची निर्मिती असलेल्या ‘सावट’ चित्रपटात श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे  मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 21 मार्च 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button