Marathi News

Motu Patlu Marathi Movie : ‘मोटू पतलू’ चा मराठमोळा अंदाज

Motu Patlu Marathi Cartoon Movie
Motu Patlu Marathi Cartoon Movie

पाच्छिमात्य एनिमेशन तंत्रज्ञान आणि चित्रपट यांच्या तुलनेत काहीसे एक पाउल मागे असणाऱ्या भारतीय चित्रपट क्षेत्रात उत्तरोत्तर बदल घडून येत आहे. ह्याच अनिमेशन चित्रपटांच्या  क्षेत्रात चार किंवा पाच वर्षे नाही तर तब्बल १६ वर्षे अविरत आणि यशस्वी कार्यरत असणाऱ्या सुहास दत्तात्रय कडव यांच नाव सध्या फारच चर्चेत आहे. जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् मधून केलेचे शिक्षण घेणारे सुहास यांचे भारतीय एनिमेशन क्षेत्रातील श्रेय वाखाण्याजोगे आहे. भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय समाजाशी भावनिक ऋणानुबंध जोडणारी ‘मोटू पतलू’ हे कार्टून्स त्यांनी जगासमोर आणले. विविधतेने नटलेल्या भारतीय मूल्यांचा आणि भावनिकतेचा समावेश त्यांच्या या कलाकृतीत दिसून येतो. मुळतः महाराष्ट्रातील साताऱ्याचे असणारे सुहास कडव यांनी ‘मोटू पतलू’ या सिरीजद्वारे भारतातील अनेक होतकरू तरूणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

विशेष म्हणजे, एका मराठी तरुणाने उचललेले हे पाऊल खरेच कौतुकास्पद आहे. ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमातून  त्यांनी सादर केलेली ही कलाकृती भारतीय मनोरंजन क्षेत्रात एनिमेशन कार्टून्स सिरीज तसेच फिल्ममध्ये क्रांती आणणारी ठरणार आहे. भारतीय एनिमेशन क्षेत्रात सध्या विकासाचे वारे वाहताना दिसत आहे. या वाऱ्यांमुळे भारताचे एनिमेशन तंत्रज्ञान सातासमुद्रापार राज्य करेल असे भाकीत देखील वर्तवले जात आहे. हे सारे सुहास कडव यांमुळे शक्य झाले.

भारतातील कलाक्षेत्रात अधिक वाव नसलेल्या या  एनिमेशन क्षेत्रात सुहास यांनी टाकलेले पाऊल मूळतः खडतर असेच होते. जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् ‘मधून बाहेर पडल्यानंतर करियरच्या अनेक दिशा त्यांना खुणावत होत्या. मात्र भारतात अनेक वर्षांपासून रुळलेल्या या कलाक्षेत्रांपासून मैलो दूर असलेल्या एनिमेशन क्षेत्रात त्यांनी नशीब आजमावण्याचा विचार केला. पाच्छिमात्य देशात प्रगतीपथावर असलेल्या या एनिमेशन क्षेत्राची पाळेमुळे भारतात रोवण्याचे ध्येय त्यांनी आखले. त्याकाळात महाराष्ट्रात नव्हे तर भारतातही या क्षेत्राला अधिक वाव नव्हता.

कोणत्याही पाठबळ किंवा प्रोत्साहनाशिवाय एनिमेशन क्षेत्रात करियर करण्याचा सुहास यांनी घेतलेला हा निर्णय धाडसीच म्हणावे लागेल! अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे व्यासपीठ स्वतः निर्माण करण्याचा चंग त्यांनी बांधला. त्यासाठी सुरुवातीचे काही वर्ष सुहास कागदावर स्केच रेखाटून आणि ते बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या हस्तकौशल्यातून सादर झालेल्या स्केचेसना त्यावेळी अधिक पसंतीदेखील मिळत होती. मात्र आर्थिकदृष्टया हे क्षेत्र अधिक विकसित करण्यासाठी त्यांना तब्बल १६ वर्ष मेहनत करावी लागली. यादरम्यान त्यांनी भारतातील विदेशी कंपनीतून एनिमेशन सिरीजच्या आऊटसोर्सिंगचे काम पहिले होते. पण अशाप्रकारे विदेशी कंपनीत करत असलेल्या नोकरीत त्यांचे मन   रमत नव्हते, त्यापेक्षा स्वतःच या क्षेत्रात कार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.  एनिमेशन कार्टून्सना भविष्यात भारतात सुगीचे दिवस येतील असा त्यांचा विश्वास होता. त्यांचा हाच विश्वास ‘मोटू पतलू’ या केरेक्टर्स मार्फत पूर्ण झाला.

एनिमेशन क्षेत्रात केलेला हा प्रदीर्घ प्रवास मागे वळून पाहताना सुहास कडव यांनी बरेच काही कमावले असल्याचे दिसून येते. भारतातील रंगसंगती, विविध धर्म, वंश आणि भाषेतून उदयास  आलेली संस्कृती आपल्या कलेतून त्यांनी साकार केली. त्यासाठी ‘मोटू पतलू’ या केरेकटर्सना घेऊन त्यांनी एक भन्नाट उपक्रम प्रेक्षकांसमोर आणला. भारतीय पाकात घोळलेला हा उपक्रम मेड इन इंडिया आहे. विशेष म्हणजे, मराठी तरुणांना घेऊन मुंबईत भारतीय तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘मोटू पतलू’ हे कार्टून्स सादर करण्यात आले.

लहान मुलांना वेडावून सोडणाऱ्या मोटू आणि पतलू या कार्टून्सना बच्चेकंपनीत मोठी प्रसिद्धी मिळत आहे. पाश्चिमात्य देशातील कार्टून्स केरेक्टर्सची भारतात वाढणारी क्रेज लक्षात घेता सुहास कडव यांच्या ‘मोटू पतलू’ला देखील मोठी पसंती मिळत आहे. विदेशी केरेक्टर पेक्षा भारतीय केरेक्टरची निर्मिती करण्याचे मोठे धाडस सुहास कडव यांनी या मालिकेच्या माध्यमातून केले होते. त्यामुळे मोटू पतलू चे हे श्रेय आणि भरतीयत्वाचे ब्रीद मोठ्या पडद्यावर साकारण्याचे धाडस आपण केले असल्याचे सुहास सांगतात.

आज प्रत्येक लहान मुलाच्या तोंडावर मोटू पतलू या केरेक्टर्स ची नावे रेंगाळताना दिसून येतायत. विदेशातील गाजलेल्या कार्टून्स केरेक्टर्सना, सर्वाधिक पसंतीच्या यादीत भारताच्या ‘मोटू पतलू’ ने केव्हाच मागे सोडले आहे. भारतीय मुलांच्या भावविश्वाचा आणि मानसिकतेचा आढावा त्यांच्या या कलाकृतीत दिसून येतो. याबद्दल सांगताना सुहास यांनी आपल्या लहान मुलाचे बारीक निरीक्षण केले असल्याचे ते सांगतात, त्याचे हसणे बोलणे तसेच त्याची विचार करण्याची पद्धत या साऱ्यांचे बारीक निरीक्षण करून सुहास यांनी ‘मोटू पतलू’ मध्ये रंग भरला आहे. अशा या लहान मुलांच्या विश्वात रंगलेल्या ‘मोटू पतलू ‘च्या मराठमोळ्या अंदाजाचे जितके कौतुक करता येईल तितके थोडेच !

Related Articles

Leave a Reply

Back to top button