Marathi News

‘पिप्सी’चे ‘गूज’गाणे

Pipsi

 

लहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या ‘पिप्सी’ या सिनेमातील नुकतेच ‘गूज’ हे गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आले आहे. समाजातील दाहकता आणि वास्तविकता चिमुकल्या डोळ्यातून पाहण्याचा नवा दृष्टीकोन या सिनेमात मांडण्यात आला असून, ‘गूज’ या गाण्यामधूनदेखील ते प्रकर्षाने दिसून येते. येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हे गाणे ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून, देबारपितो यांचे काळजाला भिडणारे संगीत त्याला लाभले आहे.

आयेशा सय्यद यांच्या आवाजात सादर झालेले हे ‘गूज’ प्रेक्षकांच्या मनाला साद घालण्यास यशस्वी ठरत आहे. कारण, हे गाणे ममतेचे प्रतिक असून, मायलेकीच्या नात्याची सुरेख अंगाई यात आहे. ‘गूज’ हे गाणे आई आणि मुलीच्या प्रेमळ नात्यावर जरी आधारित असले तरी, पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केलेल्या आपल्या गुराढोरांच्या काळजीने ग्रस्त असलेल्या गरीब शेतकऱ्याची ममतादेखील यात दिसून येते. तसेच, जिवलग मित्र बाळूच्या मदतीने ‘पिप्सी’ माश्याची आईप्रमाणे काळजी घेणारी चानीदेखील या गाण्यात पाहायला मिळत असल्यामुळे, मातृतुल्य भावभावनांची योग्य सांगड ‘गूज’ या अंगाईगीतात घातली असल्याचे दिसून येते.

मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या राज्यपुरस्कारविजेते बालकलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची निर्मिती आणि प्रस्तुती लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांनी केली आहे. सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ सिनेमात अजय जाधव, अतुल महाले, अभिलाषा पाटील आणि पूजा नायक यांचीदेखील भूमिका आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button